भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. यामध्ये भारताकडून खेळलेले अनेकजण त्यांच्या कामगिरीत लय आणण्याच्या प्रयत्न करताना दिसले. त्यातील काहीजण ठीक खेळले तर काहींची निराशा झाली. काही खेळाडू तर असे आहेत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धा गाजवल्या मात्र त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळालीच नाही. या खेळाडूने तर उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरी केली, तरीही त्याची संघात निवड झाली नाही. याबाबत निराश न होता त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी सुरूच ठेवली आणि आता तर त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध गोवा सामना (जानेवारी २२-२५) खेळला गेला. हा सामना महाराष्ट्राने ८ विकेट्सने जिंकला. त्यामध्ये त्यांचा फिरकीपटू जलज सक्सेना सामनावीर ठरला. या सामन्याबरोबरच त्याने अनेक विक्रमे रचली आहेत.
रणजीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जलज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा पार करताना ७००० धावांचा टप्पाही गाठला आहे. प्रथम श्रेणीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रजिंदर गोयल ६३७ विकेट्ससह पहिल्या स्थानावर, श्रीनिवास वेंकटराघवन ५३० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर सुनिल जोशी ( ४७९ विकेट्स , विनय कुमार (४४२ विकेट्स) पाचव्या स्थानावर आहे.
इंदौरमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू जलजने २००५मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. तो २००६ मध्ये पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळला होता. उत्तम कामगिरी असूनसुद्धा त्याला भारताच्या संघात जागा मिळाली नाही. त्याने प्रथम श्रेणीचे १५६ सामन्यांत खेळताना ३६ वेळा एका डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याने अकरा वेळा १० विकेट्स घेतल्या आहेत.
जलजने प्रथम श्रेणीत फलंदाजतही उत्तम कामगिरी करत १४ शतक आणि ३५ अर्धशतके करत ७२२४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने लिस्ट ए मध्ये ११० सामन्यात खेळताना १२३ विकेट्स घेतल्या तर २०८० धावाही केल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामामध्ये जलजने गोव्याविरुद्धच्या पहिल्या डावात ७९ धावा देत ६ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ८१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे गोव्याचा पहिला डाव २०९ आणि दुसरा डाव २४८ धावसंख्येवरच संपुष्टात आला होता. तसेच त्याने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात २२ धावाही केल्या होत्या.






