भारताचे अनेक खेळाडू जे राष्ट्रीय संघाच्या टी२०चे भाग नाहीत ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आहेत. त्यामध्ये भारताचा कसोटी-वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल, मोहम्मद सिराज, केएल राहुल, रविंद्र जडेजा इत्यादींचा समावेश आहे. सध्या भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेचे सामने सुरू आहेत. याच्या सातव्या चरणातील सामने सुरू असून राहुल कर्नाटक संघाकडून खेळत आहे.
पंजाबविरुद्धच्या या सामन्यात राहुलने महत्वाची शतकी भागीदारी करत अर्धशतकही पूर्ण केले आहे. त्याने कर्नाटकच्या पहिल्या डावात मयंक अग्रवालसोबत १२९ चेंडूत १०२ धावांची भागीदारी केली. यामध्ये त्याने संघाला उत्तम सुरूवात करून दिली, मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी त्यात अडथळा आणला. त्याला हरप्रीत ब्रार याने त्रिफळाचीत केले. तो ८७ चेंडूत ९ चौकाराच्या साथीने ५९ धावा करत बाद झाला.
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी अभिजीत गर्ग (८१ धावा, आणि इमानजोत सिंग चहल (८३ धावा) यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर १० विकेट्स गमावत ३०९ धावसंख्या उभारली. कर्नाटकच्या पहिल्या डावात १५३ धावांवर ४ विकेट्स पडल्या आहेत.
राहुलप्रमाणेच या स्पर्धेत भारताचे बाकी खेळाडूही चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करत आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये तो हैद्राबादचे कर्णधारपद भुषवत आहे.
सिराजने छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात १७ षटकात ५६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे छत्तीगडचा पहिला डाव २८३ धावंख्येवरच संपुष्टात आला. त्याच्या बदल्यात हैद्राबादचा पहिला डाव सुरू असून त्यांनी २ विकेट्स गमावत २०० धावा केल्या आहेत.
मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात मुंबईची फलंदाजी सुरू असून त्यांनी पहिल्या तीन विकेट ४४ धावंख्येवरच गमावल्या. कर्णधार सिद्धेश लाड (नाबाद २० धावा) आणि मुशीर खान (नाबाद ४५ धावा) यांनी मुंबईचा धावफलक हलता ठेवत डाव सांभाळला आहे. सध्या दोघेही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. याआधी दिल्लीने त्यांच्या पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत २२१ धावा केल्या आहेत.






