जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम चांगलाच गाजवला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक अशा ६० विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यामुळे त्याच्या या कामगिरीनंतर तो भारताच्या संघात लवकरच पदार्पण करणार अशा चर्चा सुरू झाल्या. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी महत्वाचे वक्तव्य करत औकिब भारतीय संघात येणार असा इशारा दिला आहे.
सैकिया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “औकिब नबीने उत्तम कामगिरी केली. त्याच्या योगदानामुळे जम्मू-काश्मीरला विजेतेपद पटकावता आले. त्याने उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात कमालीचे प्रदर्शन केले. त्याच्या अंतिम सामन्यातील कामगिरीने तर निकालच बदलला गेला. त्याच्या या कामगिरीचे नक्कीच कौतुक आहे. बीसीसीआयने एक असे व्यासपीठ बनवले आहे जेणेकरुन कोणाची कामगिरी वाया जाणार नाही. रणजी ट्रॉफीच्या अनेक सामन्यांमध्ये संघनिवड अधिकारी उपस्थित होते आणि मला विश्वास आहे की त्यांनी त्याचे काम चोखपणे पार पाडले असेल. सध्या औकिब चांगलाच चर्चेत आहे आणि संघनिवड अधिकारी त्याच्याविषयी नक्कीच योग्य निर्णय घेतील.”
औकिब मागील दोन वर्षांपासून सतत चांगली कामगिरी करत आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या दोन हंगामात १०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे लवकरच त्याला भारतीय कसोटी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्याला न्यूझीलंड दौऱ्यात संघात घेतले जाईल, असे म्हटले जात आहे.
रणजी ट्रॉफी २०२५-२६चा अंतिम सामना आठ वेळेचा विजेता कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला गेला. या सामन्याआधी जम्मू-काश्मीरचे गोलंदाज विरुद्ध कर्नाटकचे फलंदाज असा सामना रंगणार आणि झालेही तसेच. औकिबने कर्नाटकच्या पहिल्याच डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याने केएल राहुल, मयंक अग्रवाल, स्मरण रविचंद्रण, करुण नायर आणि शिखर शेट्टी यांना बाद केले. यावरून कर्नाटकची फलंदाजीच खिळखिळी झाली.
या सामन्यात जम्मू-काश्मीर सर्व विभागांमध्ये वरचढ निघाला आणि त्यांनी ६७ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. त्यामध्ये औकिबची कामगिरी उत्तम झाली असून लवकरच त्याला त्याच्या कामगिरीचे फळ मिळणार आहे.
२०२०नंतर जम्मू-काश्मीरचे क्रिकेटमध्ये अनेक चांगले बदल झाले. त्याचाच हा परिणाम म्हणून संघाने यंदा ही कामगिरी केली आहे. याचे सर्व श्रेय सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास यांना जाते. तसेच मनहास यांच्या मते, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झाले असे विधान जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्यावर केले होते.
भारतीय संघात असे एक उदाहरण आहे, ज्याने उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले. ईशान किशन दोन वर्षापासून संघाबाहेर होता. त्याने उत्तम कामगिरी करत संघनिवड अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि सध्या तो टी२० विश्वचषकात संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडत आहे.






