मुंबई। वानखेडे स्टेडियम सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात बडोदाने पहिल्याच दिवशी मुंबईला १७१ धावतच सर्वबाद केले आहे. दिवसाखेर बडोदा संघाने १ बाद ६३ धावा केल्या आहेत. हा मुंबईचा ५०० वा रणजी सामना आहे.
सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईच्या १७१ धावांचे प्रतिउत्तर देताना बडोद्याची सुरुवात खराब झाली त्यांचा सलामीवीर नूर पठाण अवघ्या १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दिवसाखेर बडोद्याच्या फलंदाजांनी आणखी पडझड होऊन न देता सावध खेळ करत ६३ धावा केल्या. बडोद्याकडून आदित्य वाघमोडे(१५) आणि विष्णू सोळंकी (३२) नाबाद खेळत आहेत. अजून बडोद्याचा संघ पहिल्या डावात १०८ धावांनी मुंबईच्या मागे आहे.
तत्पूर्वी बडोद्याच्या नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. बडोद्याच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवताना मुंबईच्या फलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही.
मुंबई युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आज शून्यावरच बाद झाला. विशेष म्हणजे तो आज त्याचा १८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईला बसलेल्या या पहिल्या धक्या पाठोपाठ दुसरा धक्काही लगेच बसला. पृथ्वी नंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला अजिंक्य राहणेही शून्य धावा करून बाद झाला. त्यामुळे मुंबईची अवस्था २ बाद ५ धावा अशी झाली.
त्यानंतर कर्णधार आदित्य तारे आणि श्रेयश अय्यरने डाव सांभाळायचा प्रयत्न केला परंतु श्रेयश अय्यर २८ धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच आदित्य तारे(५०) अर्धशतक करून बाद झाला. यानंतर मात्र मुंबईचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि १७१ धावांवर सर्वबाद झाले.
बडोदाकडून अतीत शेठ आणि लुकमान मेरीवाला यांनी प्रत्येकी ५ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला कमजोर केले.