मागील २ महिने प्रेक्षकांना दुमदुमून टाकणारा इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा हंगाम २९मे रोजी संपला. यानंतर आता रणजी ट्रॉफी स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. यामध्ये मध्यप्रदेश संघाची टक्कर पंजाबसोबत होत आहे. या सामन्यात आयपीएल २०२२मध्ये चमकणाऱ्या २ खेळाडूंवर सर्वांची नजर होती. एक म्हणजे पंजाबचा शुमबन गिल, ज्याने गुजरात टायटन्स संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच, दुसरा म्हणजे मध्यप्रदेशचा रजत पाटीदार, ज्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्लेऑफमध्ये पोहोचला होता.
गिलला पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. तो ९ धावांवर बाद झाला आणि तो लवकर बाद झाल्याने पंजाब संघ पहिल्या डावात २१९ धावाच करू शकला. मात्र, आयपीएलमध्ये विराट कोहली याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी दमदार कामगिरी करणारा रजत पाटीदार मध्यप्रदेशसाठी चांगलाच चमकला.
या खेळीदरम्यान पाटीदारला शतक झळकावता आले नाही. मात्र, त्याच्या ८५ धावांच्या खेळीमुळे मध्यप्रदेशने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंजाबवर १७८ धावांची आघाडी घेतली. मध्यप्रदेश संघाचा पहिला डाव ३९७ धावांवर संपुष्टात आला. लंचनंतर मध्यप्रदेशच्या ५ विकेट्स पडल्या. यामधील ४ विकेट्स फिरकीपटू विनय चौधरीच्या खात्यात गेले. त्याने ८३ धावा देऊन एकूण ५ विकेट घेतल्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
रजत पाटीदारची ८५ धावांची खेळी
या ८५ धावांच्या खेळीमुळे पाटीदारने मागील ५ प्रथम श्रेणी क्रिकेट डावांमध्ये पाचव्यांदा ५०हून अधिक धावा केल्या. आयपीएल २०२२पूर्वी त्याने केरळ संघाविरुद्ध १४२ धावा चोपल्या होत्या. त्याव्यतिरिक्त त्याने मेघालयविरुद्ध ८६ धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात पाटीदारने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर क्वालिफायर २मध्ये मध्यप्रदेशच्या या पठ्ठ्याने चांगली फटकेबाजी केली होती. त्या सामन्यात त्याने ५८ धावा चोपल्या होत्या. मात्र, त्याला आपल्या बेंगलोर संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात अपयश आले.
शाहबाज अहमदचेही अर्धशतक
पाटीदारसोबतच विराट कोहलीचा संघसहकारी शाहबाज अहमदनेही रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शानदार फलंदाजी केली. बंगालकडून खेळणाऱ्या शाहबाजने झारखंडविरुद्ध १२४ चेंडूत ७८ धावा चोपल्या. सातव्या क्रमांकावर खेळत असलेल्या शाहबाजने झारखंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली आणि त्याने २ षटकारांसह ६ चौकारांचीही बरसात केली. शाहबाज बाद झाल्यानंतर बंगालने आपला पहिला डाव ७ विकेट्स गमावत ७७३ धावांवर घोषित केला. बंगालच्या अव्वल ९ फलंदाजांनी ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, हा एक मोठा विक्रम आहे.
पाटीदार आणि शाहबाजची आयपीएल कामगिरी
पाटीदारने ८ सामन्यात ५५.५०च्या सरासरीने ३३३ धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि २ अर्धशतकेही झळकावली. दुसरीकडे, शाहबाजने १६ सामन्यात २७.३८च्या सरासरीने २१९ धावा केल्या होत्या.
मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर