क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडूंच्या वयावर प्रश्न उपस्थित केले जातात. खेळाडू त्यांचे वय कमी करतात, असा आरोप अनेकदा केला जातो. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानवर देखील अनेकदा असे आरोप झाले आहेत. यावर आता अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनं मोठा खुलासा केला.
शुभंकर मिश्रा यांच्या एका पॉडकास्टमध्ये हशमतुल्ला शाहिदीला राशिद खानच्या वयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या वयाबाबतही चर्चा झाली. राशिद खानच्या वयाबद्दल हशमतुल्ला म्हणाला, “सध्या मला वाटतं की राशिद 26 वर्षांचा आहे. मला शाहिद आफ्रिदीबद्दल माहिती नाही.”
हशमतुल्ला शाहिदी पुढे म्हणाले की, “आम्ही पठाण आहोत, आमची एक गोष्ट आहे. आम्ही एका गोष्टीवर थांबतो.” तो पुढे गमतीनं म्हणाला, “म्हणूनच कदाचित आम्ही एका वयावर थांबलो.”
राशिद खाननं पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. तो 2015 पासून अफगाणिस्तानकडून क्रिकेट खेळत आहे. राशिदनं किशोरवयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तो अफगाणिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे. राशिद सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता.
राशिद खाननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 5 कसोटी, 105 एकदिवसीय आणि 93 टी20 सामने खेळले. त्यानं कसोटीच्या 9 डावात 34 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं 7 डावात फलंदाजी करताना 106 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांच्या 100 डावांमध्ये राशिदनं 190 विकेट्स घेतल्या. शिवाय त्यानं 82 डावांमध्ये फलंदाजी करताना 1322 धावा केल्या, ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 56 डावांमध्ये त्यानं 152 विकेट घेतल्या आहेत आणि 460 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
“आता शिकला नाही तर कधी शिकणार…”, पाकिस्तानी दिग्गजाने भारतीय स्टार खेळाडूला सुनावले
MI, RCB पासून CSK पर्यंत…प्रत्येक संघ कोणत्या 5 खेळाडूंना रिटेन करू शकतात; वाचा यादी
कानपूर कसोटीत कोहलीकडून; ‘विराट’ कामगिरी अपेक्षित! या विक्रमांवर असणार डोळा