अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेला सीमावाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये १६ मार्चच्या रात्री पाकिस्तानने एका रुग्णालयावर हल्ला केला. त्यामुळे अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये हाहाकार माजला. या हल्ल्यात अंदाजे ४०० अफगाण लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार राशिद खान याने हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्या कुटुंबीयांसाठी दु: ख व्यक्त केले आहे.
राशिदने त्याच्या एक्सच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा युद्ध गुन्हा आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि गंभीर चिंताजनक आहे. यामुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल.”
त्या पोस्टमध्ये राशिदने पुढे लिहिले, “मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या नवीनतम अत्याचाराची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण बरे होऊ आणि एक राष्ट्र म्हणून आपण उठू. आपण नेहमीच असे करतो.”
राशिदबरोबर अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू आणि माजी कर्णधार मोहम्मद नबी यानेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. नबीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज रात्री काबूलमधील एका रुग्णालयात आशेचा किरण मावळला. उपचारासाठी आलेल्या तरुण मुलांना पाकिस्तानी लष्करी राजवटीने केलेल्या बॉम्बस्फोटात ठार मारण्यात आले. माता रुग्णालयाच्या दारात उभ्या राहून आपल्या मुलांची नावे पुकारत होत्या. रमजानच्या २८ व्या रात्री त्यांचे आयुष्य अकाली संपले.”
माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी सोमवारी रात्री उशिरा राजधानी काबूलमधील अनेक भागांना लक्ष्य केले. या हल्ल्यात एका रुग्णालयावरही हल्ला झाला, ज्यात ४०० जण ठार आणि २५० हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांचे म्हणणे होते की, हा हल्ला नागरी वस्तीवर नाही तर दहशतवादी ठिकाणांवर केला गेला.






