टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ सामन्यांना दणक्यात सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या शानदार विजय मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू राशिद खानने भावनिक संदेश दिला आहे. या दणदणीत विजयामुळे अफगाणिस्तानातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच या विजयामुळे अफगाणिस्तानातील लोकांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे, असे राशिद खानने ट्विट केले आहे.
सोमवारी (२५ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १३० धावांनी पराभव केला. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या गट २ च्या सामन्यात, अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकात केवळ ६० धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने २० धावांत ५ बळी घेतले, तर नजीबुल्ला झादरनने ३४ चेंडूंत ५९ धावांची धडाकेबाज खेळी केली.
या विजयानंतर राशिद खानने ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला आहे. त्याने आपल्या संदेशात लिहिले आहे की. ‘मस्त सुरुवात. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि विशेषत: देशवासियांना शुभेच्छा. मला आशा आहे की हा विजय तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि तुम्हाला आनंद साजरा करण्याची संधी देईल. देवाच्या कृपेने आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू आणि आपल्या देशाचा गौरव वाढवू. तुमच्या प्रार्थना आणि पाठींबा सदैव आमच्या पाठीशी असतातच. अफगाणिस्तान झिंदाबाद.’
Great start congratulations to Everyone and specially to the people back home 🇦🇫.I hope this win have given you something to smile and celebrate. INSHALLAH We will do the best and make the country and nation more proud.Your prayers and support is always🔑🇦🇫
Afghanistan zindabad pic.twitter.com/w53EorFNws
— Rashid Khan (@rashidkhan_19) October 25, 2021
तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानात प्रचंड गोंधळ माजला होता. शेकडो लोकांना आपली घरे सोडावी लागली, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. राशिद खानने वेळोवेळी यासंदर्भात ट्विट करून परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच या विजयाने देशवासीयांच्या जखमेवर थोडे फुंकर मारण्याचे काम केले असावे.