काल सुरु झालेल्या विवो आयपीएलमध्ये मागील वर्षीप्रमाणेच पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला. २०८ धावा करत मालिकेची सुरुवात दणदणीत झाली. मागच्या वर्षी आणि या वर्षीच्या सामान्यातला मोठा फरक म्हणजे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाज राशीद खान. अफगाणिस्तानकडून आयपीएलमध्ये खेळणारा पहिला खेळाडू हा मान मिळवणारा हा खेळाडू. राशीदसोबतच अफगाणिस्तान संघाचा २०१५ पर्यंतचा कर्णधार मोहमद नबी सुद्धा हैदराबाद संघात आहे.
अफगाणिस्तानचा विषय निघाला की सर्वप्रथम जे मनात येतं ते म्हणजे तिथली राजकीय परिस्थिती, सतत होणारे दहशतवादी हल्ले आणि सर्वसामान्यांची होणारी ओढाताण. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा उगम झाला तो तिथे वसलेल्या निर्वासित छावण्यांमधून. गोळीबार, मारामारी, हल्ले हे दृश्य म्हणजे तिथल्या लोकांसाठी नेहमीचेच. पण ह्या स्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द आणि दृढ निष्ठेच्या बळावर जेव्हा खेळाडू घडतात तेव्हा ते नबी आणि राशिद यांच्या रूपात तयार होतात.
अफगाणिस्तान संघातले बहुतेक खेळाडू हे निर्वासित छावण्यांमधून घडले आहेत, शिवाय छावण्यांजवळपासच्या परिसरातून देखील खेळाडू तयार झाले. २००१ साली अफगाणिस्तान संघाची स्थापना झाली. अत्यंत संघर्षमय प्रवासानंतर २०१० साली अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला, आणि आता २०१७ हे वर्ष तर नबी आणि राशिदसाठी अविस्मरणीय ठरले आहे. जगभरात होणाऱ्या सर्वोत्तम क्रिकेट लीगचा भाग होणे म्हणजे इतके वर्ष केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे आहे. १८ वर्षीय राशीदने पहिल्याच सामन्यात २ बळी मिळवत आपल्याला दिलेली संधी योग्य असल्याचे दाखवून दिले. राशिदच्या आयपीएल कारकीर्दीतल्या पहिल्या बळीनंतर मोहमद नबीच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.
काल झालेला सामना ही फक्त सुरुवात होती आता या दोघांचं नशिब आणि मेहनत त्यांना किती उंचावर घेऊन जाते हे बघण्यासारखे आहे. क्रिकेटमुळे जर दहशतवादाला लगाम लागणार असेल तर या सारखे हजारो खेळाडू घडोत आणि आपल्या देशाचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर घेऊन जावोत, हीच प्रार्थना तेथील सर्वसामान्य जनता करत असेल यात काही शंका नाही.
Inputs – Mohar Moghe ( Asst. Editor, Viva Football)