दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (२ मे) रंगलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात युवा संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाने अनुभवी केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा ५५ धावांनी दारुण पराभव केला होता. अशात एकीकडे विजयाचा जल्लोष असताना दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघासाठी वाईट बातमी पुढे आली आहे.
युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत ३ विजय मिळवले आहेत. परंतु या संघात दुखापतीमुळे माघार घेतलेल्या अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची कमतरता जाणवत आहे. त्याच्याऐवजी संघात दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज वॅन दर डसन याला संधी देण्यात आली होती. परंतु त्याचे आयपीएल २०२१ स्पर्धेत खेळणे कठीण दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय रासी वॅन दर डसनला भारतात येण्यासाठी व्हिजा दिला गेला नाहीये. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे त्याला भारतात येण्याची परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे. याच कारणास्तव आयपीएल २०२१ मधील आपला पहिला सामना खेळण्यापुर्वीच रासी वॅन दरला आयपीएलला मुकावे लागू शकते.
या कारणामुळे बेन स्टोक्सने घेतली होती माघार
खरंतर बेन स्टोक्स यंदा संपूर्ण हंगामात खेळणार होता. मात्र पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळताना त्याला ख्रिल गेलचा झेल घेण्याच्या प्रयत्नात हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचीही गरज पडल्याने तो मायदेशी परतला. तो आता जवळपास ३ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर झाला आहे.
अशी आहे वॅन दर डसनची कारकीर्द
वॅन दर डसनने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान संघाविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.वनडे मालिकेत त्याने १ शतक तर १ अर्धशतक झळकावले होते. याचबरोबर, टी-२० मालिकेतही १ अर्धशतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत १२६ टी -२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३८.६२ च्या सरासरीने ३ शतक आणि २६ अर्धशतकांसह ३८२४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कमालचं! ‘या’ ३४ वर्षीय महारथी क्रिकेटपटूने तब्बल ३४ वेगवेगळ्या संघाकडून खेळले आहे क्रिकेट
SRHचं कंबरड मोडत शतक झळकावणारा बटलर म्हणतोय, “आता त्याची बोलती बंद करायची आहे”
आधी नेतृत्त्व काढून घेतलं, मग संघातील स्थानही; डेविड वॉर्नरच्या भावाने SRHला घेतलं फैलावर