---Advertisement---

MPL 2025: विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी रत्नागिरीची या पाच शिलेदारांवर मदार

On: सोमवार, जून 2, 2025 5:05 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 मध्ये यावेळी रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) विजेतेपदाची हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या दोन स्पर्धा निर्विवादपणे गाजवल्यानंतर तिसऱ्या स्पर्धेतही आपली हुकूमत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कर्णधार अझीम काझी याच्या नेतृत्वातील रत्नागिरी संघ सज्ज असला तरी, संघाला ‘ट्रॉफी हॅट्रिक’ चे हे दिव्य पार पाडायचे असल्यास या पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणे गरजेचे आहे.

सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav)- पहिल्या हंगामात सोलापूरसाठी खेळल्यानंतर दुसऱ्या हंगामात अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव रत्नागिरी जेट्सचा भाग बनला. विजेत्या संघात पोहोचल्यानंतर त्याची कामगिरी अचानक उंचावली. त्याच्या फिरकीने संपूर्ण हंगामात फलंदाजांना चकवले. हंगामात सर्वाधिक 25 बळी घेत पर्पल कॅप त्याने आपल्या डोक्यावर घेतली. क्वालिफायर आणि अंतिम सामन्यात तो सामनावीर होता. तीच कामगिरी पुन्हा एकदा करून संघाला तो तिसऱ्यांदा विजेता बनवू शकतो.

विजय पावले (Vijay Pawle)- सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय पावले याने आपल्या खेळाने सर्वांनाच भुरळ पाडली. टेनिस क्रिकेटमधील मातब्बर खेळाडू असलेल्या विजयने पहिल्या हंगामात प्रथमच व्यावसायिक क्रिकेट खेळले होते. आपल्या गोलंदाजीतील वैविध्याने त्याने फलंदाजांना मोकळेपणाने धावा करू दिल्या नाहीत. संघात अनेक अनुभवी वेगवान गोलंदाज असताना त्याने आपली ओळख निर्माण केली. सलग दोन विजयात शिल्पकार राहिलेल्या विजयकडे यावेळी आणखी शानदार कामगिरी करण्याची संधी असेल.

धीरज फटांगरे ( Dhiraj Phatangare)- युवा फलंदाज धीरज फटांगरे याने पहिल्या दोन हंगामात आपल्या फलंदाजीने रत्नागिरी जेट्स संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याचे त्याचे कसब त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवल्याने इतर फलंदाज आक्रमक खेळ दाखवू शकतात. रत्नागिरी जेट्सला विजेचेपदाची हॅट्रिक करायचे असल्यास, पहिल्या दोन हंगामाप्रमाणे धीरज याला देखील आपला सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल.

निखिल नाईक (Nikhil Naik)- मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघाचा प्रमुख यष्टिरक्षक असलेला निखिल नाईक तिसऱ्या वर्षी रत्नागिरी जेट्स संघासाठी खेळत आहे. संघात ज्या खेळाडूंकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यापैकी निखिल एक असून, त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होताना दिसतो. निखिल याने पहिल्या दोन्ही हंगामात सर्वाधिक स्ट्राइक रेट राखणाऱ्या ‌पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान कायम ठेवलेले. फिनिशर म्हणून त्याच्याकडे दिलेली जबाबदारी त्याने पार पाडली. सलग तिसऱ्या हंगामात निखिल याच्याकडून रत्नागिरी जेट्सला अशीच कामगिरी अपेक्षित असेल.

दिव्यांग हिंगणेकर (Divyang Hingnekar)- महाराष्ट्राचा प्रमुख अष्टपैलू असलेला दिव्यांग हिंगणेकर हा देखील इतर खेळाडूं प्रमाणेच सलग तिसऱ्या हंगामात रत्नागिरीसाठी खेळेल. दुसऱ्या हंगामात लिलावात गेल्यानंतर रत्नागिरीने त्याच्यासाठी सर्वात मोठी बोली लावली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज व आक्रमक फलंदाज अशी त्याची ओळख आहे. पहिल्या दोन हंगामात अनेक सामने त्याने एकट्याच्या बळावर जिंकून दिलेले दिसतात. यावेळी त्याला आपला खेळ अधिक उंचावत, संघाच्या विजयात योगदान द्यावे लागेल.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे, एमपीएल 2025 सोबत प्रथमच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिलांची टी20 लीग देखील होणार आहे. अशाप्रकारे लीग आयोजित करणारी एमसीए देशातील पहिली राज्य क्रिकेट संघटना आहे. या दोन्ही स्पर्धा पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना कोणत्याही तिकीटाविना प्रवेश दिला जाईल. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धा पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---