स्पर्धा सुरू होताच पंजाब किंग्जची कामगिरी पाहून त्यांना आयपीएल २०२६ साठी विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते, आता मात्र ते या हंगामासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाहीत याच्या आशाही कमी होताना दिसत आहेत. त्यांची स्थिती अशी का आहे आणि त्यांनी आता काय करावे याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने त्याचे मत मांडले आहे. त्याचबरोबर त्याने पंजाबसाठी विजेतेपद जिंकण्याची युक्तीही सुचवली आहे.
पंजाब किंग्जचा माजी कर्णधार अश्विनने हे मान्य केली की, पंजाब फ्रॅंचायजीला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेता येत नाही, कारण प्रत्येक हंगामात ते जवळपास निम्मे घरचे सामने एका ठिकाणी आणि काही सामने दुसऱ्या ठिकाणी खेळतात ज्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागतो. यावेळी अश्विनने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांची उदाहरणे दिली आहे.
अश्विनने आपल्या युट्युब चॅनेलवर सांगितले की, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैद्राबाद या फ्रॅंचायजी इतक्या यशस्वी का आहेत, कारण त्यांनी त्यांचे घरचे सामने घरच्या मैदानांशिवाय इतर स्टेडियमध्ये खेळले नाहीत. पंजाब किंग्जला मात्र त्यांचे घरचे मैदान मोहालीहून न्यू चंदीगडला बदलावे लागले. इतकेच नाही तर हा संघ प्रत्येक हंगामात दोन किंवा तीन घरचे सामने इतर शहरांमध्ये खेळतो. त्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहे. ठिकाण बदलल्याने प्रेक्षक आकर्षित होत आहेत, मात्र संघाचे नुकसान होत आहे.
“आयपीएलमधील तीन ते चार चॅम्पियन्स संघांनी घरचे मैदान कधीच बदलले नाहीत. तुम्ही मुल्लाणपूरमध्ये सलग सामने जिंकले आणि मग आता तुम्ही धरमशालेत जाता आणि त्या तुमच्या घऱच्या मैदानावर सलग तीन सामने गमावता. त्यामुळे माझ्या मते पंजाबने सर्व घरचे सामने मुल्लाणपूरमध्ये खेळावे. चेंडू थोडा खाली असल्याने, तेथिल खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नाही,” असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.
अश्विनने एका व्हिडिओमध्ये म्हटले होते, “केकेआर, सीएसके आणि एमआय हे तीन संघ आहेत, ज्यांनी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. या तिघांनी मिळून १९ हंगामामध्ये १३ ट्रॉफी जिंकल्या. हैद्राबादने दोन (एक डेक्कन आणि एक एसआरएच), यामुळे या दोन्ही ट्रॉफी मिळून १५ होतात. हे संघ त्यांचे सर्व घरचे सामने एकाच मैदानावर खेळतात, तर त्यात त्यांच्यासाठी नक्कीच काहीतारी असेल, नाही का?”






