भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी (27 जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतानं श्रीलकेचा 43 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांवर ऑलआऊट झाला.
या सामन्यात भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईसोबत एक अपघात झाला. तो गोलंदाजी करताना डोळ्याला होणाऱ्या दुखापतीतून अगदी थोडक्यात बचावला. मात्र, दुखापत होऊनही त्यानं गोलंदाजी चालू ठेवली. शनिवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात रवी बिश्नोईनं एक असा झेल घेण्याचा प्रयत्न केला, जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. मात्र, नशिबानं त्याला साथ दिली आणि चेंडू त्याच्या डोळ्याला लागला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
हा सर्व प्रकार सामन्याच्या 16व्या षटकात घडला. या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीला आला. श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसनं बिश्नोईच्या गुगलीवर एक शॉट मारला. बिश्नोईनं एका हातानं चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्याच्या डोळ्याजवळ आदळला. जर चेंडू थोडा वर असता, तर त्याला गंभीर दुखापत झाली असती.
— hiri_azam (@HiriAzam) July 27, 2024
या अपघातानंतरही बिश्नोईनं धीर सोडला नाही. त्यानं श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असालंकाला बाद केलं. या सामन्यात रवी बिश्नोईनं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 37 धावा देत 1 विकेट घेतली. त्याचा इकॉनॉमी रेट 9.2 एवढा राहिला.
मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 28 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. यानंतर मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. टी20 मालिका संपल्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 ऑगस्टपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.