मुंबई । गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या लिलावात आयपीएल फ्रेंचायझीं संघानी अनेक तरुणांना संधी दिली आहे. राजस्थानचा फिरकीपटू रवी बिश्नोईही यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने 19 वर्षाखालील विश्वचषकातील या स्टार गोलंदाजला दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.
रवीला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यासाठी मुरुगन अश्विनशी स्पर्धा करावी लागेल. कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज जे शुचित हा संघातील अन्य फिरकीपटू आहे. बिश्नोई केवळ लेगस्पिनवर अवलंबून नाही तर तो चांगली गुगलीही टाकतो.
रवी बिश्नोईचा प्रवास
दोन वर्षांपूर्वी रवी बिश्नोईने राजस्थानकडून खेळताना कूच बिहार ट्रॉफीमध्ये 47 विकेट घेतल्या. विनू मांकड ट्रॉफीमध्ये 22 विकेट घेऊन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. या कामगिरीमुळे रवीला 19 वर्षांखालील भारतीय संघात स्थान देण्यात आले. रवीने चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये तीन सामन्यांत सहा गडी बाद केले. नंतर 19 वर्षांखालील ‘अ’ संघात सामील केले. या संघाकडून खेळताना रवीने दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 3 सामन्यात 7 गडी बाद केले.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) मध्ये अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपला खेळ आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बिश्नोई म्हणाला की, ‘कुंबळे यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवून मला अधिक शिकायचे आहे.’ आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथची विकेट घेण्याचे बिश्नोईचे स्वप्न आहे.
रवी बिश्नोईने आतापर्यंत ‘अ’दर्जाचे सहा सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने 5.63 च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने सहा टी -20 सामनेदेखील खेळले आहेत, ज्यात त्याने सात विकेट घेतल्या आहेत.