संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघ नामिबियाविरूद्ध आपला अखेरचा साखळी सामना खेळत आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी हा औपचारिक सामना असेल. यासोबतच रवी शास्त्री यांचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपुष्टात आला. आपल्या या अखेरच्या सामन्यापूर्वी विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.
काय म्हणाले शास्त्री?
भारतीय संघाचे दोन वेळा मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या शास्त्री यांनी आपल्या अखेरच्या सामन्यापूर्वी प्रसारण वाहिनीशी बोलताना भारतीय संघाच्या विश्वचषकातील कामगिरीविषयी प्रतिक्रिया दिली. शास्त्री म्हणाले,
“आम्ही विश्वचषकात दावेदार म्हणून सहभागी झालो होतो. मात्र, केवळ दोन सामन्यात खराब कामगिरी झाल्यामुळे अपेक्षित ठिकाणी पोहोचू शकत नाही. खेळाडू हे मानसिकरित्या व शारीरिकरीत्या पूर्णपणे थकले होते. ज्यावेळी तुम्ही दोन्हीप्रकारे थकलेले असतात, त्यावेळी तुमच्याकडून योग्य कामगिरी होत नाही.”
भारतीय खेळाडू हे मार्च महिन्यापासून सातत्याने बायो-बबलचा भाग आहेत. कोरोना महामारीमूळे सर्व प्रकारचे क्रिकेट हे बायो-बबलमध्ये खेळले जात असून, यामध्ये खेळाडूंना इतरत्र फिरण्याची परवानगी नसते.
शास्त्री यांनी भारतीय संघाच्या कामगिरीसाठी सरळसरळ आयपीएलला दोष दिला. ते म्हणाले,
“सध्या खेळाडू मागील सहा महिन्यापासून बायो-बबलमध्ये आहेत. मला वाटते की, आयपीएल आणि विश्वचषक यांच्यादरम्यान आणखी कालावधी हवा होता. आयसीसीने पुढील काळातील गांभीर्याने या गोष्टीचा विचार करायला हवा.”
रवी शास्त्री हे २०१७ नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे. ते २०१५-२०१६ मध्ये भारतीय संघाचे संचालक म्हणून देखील कार्यरत होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय