आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजांची अवस्था फारच वाईट झाली आहे. जवळपास प्रत्येक सामन्यातच 200 धावांचा टप्पा गाठला जातोय. त्यामुळे क्रिकेटचे नियम फलंदाजांना जास्त फायदेशीर ठरतायेत की काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. शास्त्री म्हणाले की, “गोलंदाजांनी त्यांचं रडगाणं थांबवण्याची गरज आहे. सध्या गोलंदाजांनी स्वत:वर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी जास्त प्रयोग करू नयेत. तरच ते फलंदाजांवर नियंत्रण ठेवू शकतील.”
आयपीएलच्या या हंगामात फलंदाजांनी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली आहे. जवळपास प्रत्येकच सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा केल्या जात आहेत. या हंगामात फलंदाजाचे अनेक विक्रम मोडले गेले आहेत. 26 एप्रिल रोजी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही मोडला गेला. या सामन्यात पंजाबनं केकेआरनं दिलेल्या 262 धावांच्या लक्ष्याचा 19व्या षटकातच यशस्वी पाठलाग केला.
रवी शास्त्री यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “आयपीएल पाहण्याची ही उत्तम संधी आहे. गोलंदाजांची ज्या पद्धतीनं धुलाई होत आहे, ते पाहता हा गोलंदाजांसाठी कसोटीचा काळ आहे. हा कसोटीचा काळ बरेच दिवस चालेल. अशा वेळी गोलंदाजांनी नवनवीन प्रयोग करणं योग्य ठरणार नाही. त्यांनी असे चेंडू टाकू नये, ज्याचा वापर ते योग्य रित्या करू शकत नाहीत.” माजी भारतीय प्रशिक्षकाच्या मते, गोलंदाजांनी आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. स्वतःला स्पर्धात्मक ठेवा. ही रडण्याची वेळ नाही, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
Great opportunity watching this @IPL for bowlers to focus on the time tested and execution of things that have lasted the Test of time. Rather than in pursuit to add baggage to your limited armoury that you can’t execute. Get stuck in to your strengths and focus. Great…
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 27, 2024
आयपीएलच्या या हंगामामध्ये एकापाठोपाठ मोठ्या धावसंख्या रचल्या जात आहेत. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 257 धावा केल्या. यंदाच्या हंगामात आठव्यांदा 250 ची धावसंख्या ओलांडली गेली आहे. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात असं एकदाच घडलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे एवढी मोठी धावसंख्या करूनही संघ सामना जिंकेलच याची शाश्वती नाही. तसेच पॉवरप्लेमध्ये 100 धावांचा पल्ला गाठणंही आता सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे हे आयपीएल गोलंदाजांचा कर्दनकाळ बनून आलंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पांड्या-बुमराह कोणालाच सोडलं नाही! ‘मॅकगर्क’ नावाच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज पाचोळ्यासारखे उडाले
पृथ्वी शॉचं करिअर धोक्यात? खराब फॉर्ममुळे दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता