इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शस्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आणि त्यापाठोपाठ संघाचे फिजियो योगोश परमार हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आले. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यानंतर आता भारतीय सपोर्ट स्टाफमधील पहिल्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेले शास्त्री, भरत आणि श्रीधर हे बुधवारी (१५ सप्टेंबर) भारतासाठी रवाना होतील असा अंदाज आहे. तत्पूर्वी, त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि अहवाल निगेटिव्ह आला, तरच ते रवाना होतील.
शास्त्री ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या इंग्लंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या आधी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ते चार सप्टेंबरपासून विलगीकरणात आहेत. शास्त्री, अरुण आणि श्रीधर यांचा विलगीकरणातील १० दिवसांचा कालावधी सोमवारी (१३ सप्टेंबर) पूर्ण होणार आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते तिघेही ब्रिटेनमधून भारतासाठी रवाना होतील.
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार असून स्पर्धा संपल्यानंतर १७ ऑक्टोंबरपासून टी२० विश्वचषकाचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये केले जाणार आहे. विश्वचषकासाठी जेव्हा भारतीय संघ एकत्र येईल तेव्हा तिन्ही प्रशिक्षक संघासोबत सामिल होतील असा अंदाज आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर माहिती दिली की, “रवी, अरुण, आणि श्रीधर यांना कसलीही समस्या नाहीये आणि कोणतेही जास्त लक्षण नाहीत. ते सोमवारी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करतील आणि सर्वकाही ठीक राहिले, तर ते ठरलेल्या तारखेला भारतासाठी रवाना होऊ शकतात, जी १५ सप्टेंबर आहे. अंतिम निर्णय चिकित्सीय टीमद्वारे घेतला जाईल.”
यादरम्यान भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्य सोमवारी दुपारी व्यावसायिक विमानाने दुबईमार्गे भारतात येणार आहेत. ८ सप्टेंबरला कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेले संघाचे फिजियो योगेश परमार यांना आणखी काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. दरम्यान, इंग्लंविरुद्धचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द केला गेला आहे. बीसीसीआयने हा सामना भविष्यात पुन्हा खेळला जावा यासाठी ईसीबीकडे प्रस्ताव केला आहे. हा सामना पुढच्या वर्षी जलैमध्ये खेळला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २४ हजार धावा आणि ४०० गडी बाद करणारा ‘हा’ क्रिकेटर टी२० विश्वचषकानंतर घेणार निवृत्ती
आयपीएलप्रेमींनो, धरा युएईची वाट!! २ वर्षांनंतर स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश, पण आहे एक अट