भारतीय संघाचे सर्वात यशस्वी मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या प्रशिक्षणावेळी भारत कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला, तर सलग दोन वेळा त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तर त्यांनी एकही आयसीसी चषक न जिंकल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असतात, अखेर त्या प्रश्नाचे उत्तर शास्त्रींनी दिले आहे.
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यावेळी समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळात भारताने आयसीसी चषक का जिंकला नाही याचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “भारताकडे एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू नव्हता यामुळेच भारताला आयसीसीच्या महत्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.”
शास्त्रींनी फॅनकोडशी बोलताना म्हटले, “मला एक असा खेळाडू हवा होता जो पहिल्या सहामध्ये गोलंदाजी करेल. अशातच हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त झाला. यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आणि दोन विश्वचषक गमवावे लागले होते. आम्ही निवडकर्त्यांना ‘तो सहावा खेळाडू’ शोधायला सांगितले होते. मात्र अखेरपर्यंत तसा खेळाडू आम्हाला मिळालाच नाही.”
शास्त्री यांच्या प्रशिक्षणावेळी भारताला २०२१मध्ये आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. नंतर टी२० विश्वचषकातही भारत साखळी फेरीतून बाहेर पडला होता. तसेच २०१९च्या वनडे विश्वचषकात उपांत्यफेरीत भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते. या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत जर भारताकडे युवराज सिंग सारखा अष्टपैलू खेळाडू असता तर आजचे चित्र निराळे असते. युवराजने २०११च्या वनडे विश्वचषकात उत्तम अष्टपैलू कामगिरी केल्याने भारत विजेता ठरला. या स्पर्धेत तो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. युवराजनंतर हार्दिक त्या खेळाडूची जागा भरून काढेल अशी चर्चा होत होती.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला २०१८च्या एशिया कप दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तीन वर्षे तो त्या दुखापतीमुळे त्रस्त झाला होता. २०२१च्या टी२० विश्वचषकामध्येही त्याला दुखापतीमुळे गोलंंदाजी करता आली नव्हती. या स्पर्धेनंतर तो भारतीय संघासाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) धमाकेदार पुनरागमन केले. गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भुषविताना त्याने संघाकडून अष्टपैलू खेळी करत पदार्पणातच विजेतेपद जिंकून दिले. पुढे त्याने आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधार पदाची भुमिका पार पाडताना संघाला टी२० मालिका जिंकून दिली होती.
नुकतेच हार्दिकने इंग्लंड दौऱ्याच्या मर्यादित षटकाच्या सामन्यात उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याचा हा फॉर्म असाचा काम राहावा हीच अपेक्षा आहे. कारण भारताला यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक आणि पुढच्या वर्षी घरच्या मैदानावर होणाऱ्या वनडे विश्वचषकात उत्तम कामगिरी करण्यासाठी हार्दिकसारख्या खेळाडूची आवश्कता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी
अक्षरने षटकार लगावत सामनाच नाही तर धोनीचा रेकॉर्डही केलायं फिनीश, रचले ‘हे’ दोन नवीन विक्रम