साल २०१८ पासून सुरू झालेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर खेळवल्या जाणार्या अंतिम सामन्यातून पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता जगाला मिळेल. भारत आणि न्यूझीलंडचे संघ हे विजेतेपद पटकवण्यासाठी अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.
या सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच आयसीसीला या मुद्द्यावरून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
अंतिम फेरीसाठी करावा ‘हा’ बदल
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता अंतिम सामन्याद्वारे ठरवला जाईल. मात्र रवी शास्त्री यांनी या प्रकारात बदल सुचवला आहे. त्यांच्या मते कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी केवळ एक सामना असू नये. तर तीन कसोटी सामने खेळवून त्यातून विजेतेपद देण्यात यावे.
या मागणीबाबत स्पष्टीकरण देतांना शास्त्री म्हणाले, “जर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा पुढे चालू ठेवायची असेल तर अंतिम फेरीसाठी ‘बेस्ट ऑफ थ्री’ प्रकारचे अंतिम सामने असावेत. अडीच वर्षांच्या स्पर्धेचा समारोप करण्यासाठी तीन सामन्यांची मालिका अधिक योग्य असेल. कुठलाही संघ रातोरात सर्वोत्तम ठरला नाही आहे. काही वर्षांची मेहनत त्या पाठीमागे आहे. त्यामुळे केवळ एका सामन्याच्या आधारे विजेता संघ घोषित करणे उचित ठरणार नाही.”
“या सामन्याचे महत्व अनन्यसाधारण”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे महत्व अधोरेखित करतांना शास्त्री म्हणाले, “कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पहिल्यांदाच खेळवला जातो आहे. या सामन्याचे महत्व पाहिल्या गेले तर ते मोठे नाही तर खूप जास्त मोठे आहे. कारण कसोटी क्रिकेट हा सर्वात अवघड प्रकार आहे. हा असा प्रकार आहे, जो तुमची सर्वांगाने कठोर परीक्षा घेतो. दोन वर्षांहून अधिक काळ अनेक सर्वोत्तम संघांना पराभूत करत आम्ही अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यामुळे आमच्यासाठी या सामन्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.”
महत्वाच्या बातम्या:
मला बोर्डाचे चेअरमनपद दिले तर मी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही
टेस्ट कॅप नं. २८१! ऐतिहासिक लॉर्डसवर न्यूझीलंडसाठी या आफ्रिकन फलंदाजाने केले पदार्पण
लॉर्डस कसोटीत उतरताच जेम्स अँडरसनच्या नावे झाला हा खास विक्रम