fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ

सोमवारी(15एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते 15 जणांऐवजी 16 जणांचा संघ जाहीर करण्यास पसंती दिली असती असे म्हटले आहे.

शास्त्री म्हणाले, ‘मी निवड प्रक्रियेत सामील नव्हतो. आमचे काही विचार असेल तर ते कर्णधार सांगतो. जर तुम्हाला 15 जणांची निवड करायची आहे तर कोणालातरी बाहेर करावे लागते, जे खूप दुर्दैवी आहे. मी 16 खेळाडूंची निवड करणे पंसत केले असते. आम्ही आयसीसीलाही या गोष्टीची माहिती दिली होती की एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी 16 जणांची निवड करायला हवी. पण 15 खेळाडू निवडण्याचे आदेश होते.’

2019 च्या या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे याबद्दल अनेक चर्चा सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात रंगल्या आहेत.

याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ‘ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यांनी त्यांचे मन छोटे करु नये. हा मजेदार खेळ आहे. यात खेळाडू दुखापतग्रस्त देखील होऊ शकतात. त्यामुळे तूम्हाला माहीत नाही की कधी कोणाला संधी मिळेल.’

तसेच जेव्हा शास्त्रींना रायडू चौथ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार असताना विजय शंकरला कसे निवडण्यात आले असे विचारले असता, शास्त्री म्हणाले, ‘परिस्थिती आणि विरोधी संघाचा विचार करता हे स्थान खुले आहे. मी म्हणेल की पहिले तीन क्रमांक निर्धारित आहेत पण त्यानंतरचे क्रमांक खुले आहेत. त्याजागेवर कोणालाही संधी मिळू शकते.’

याबरोबरच विश्वचषकात विजेतेपदाचे प्रबळ दावेदारांबद्दल शास्त्री म्हणाले, इंग्लंड मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच त्यांच्याकडे फलंदाजांची आणि गोलंदाजीची खोली आहे आणि ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे ते प्रबळ दावेदार असतील.’

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: असा आहे श्रीलंकेचा १५ जणांचा संघ; या अनुभवी खेळाडूंना संधी नाही

रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी

चार वर्षांपासून एकही वनडे न खेळलेला क्रिकेटपटू करणार विश्वचषकामध्ये श्रीलंकेचे नेतृत्व

You might also like