भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात अति महत्त्वाची अशी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. बारा वर्षांपासून सुरू असलेला विश्वचषकाचा वनवास भारतीय संघ यावेळी संपवू इच्छितो. विश्वचषकासाठी आता अवघे काही महिने शिल्लक असताना, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी एक मोठे विधान केले आहे.
यावेळी विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. मात्र, विश्वचषकानंतर भारतीय संघात लगेचच बदल करण्यात यावे अशी अपेक्षा रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
“विश्वचषकात निकाल काय लागतो याकडे आपण फारसे लक्ष द्यायला नाही पाहिजे. आपण विश्वचषक जिंकला तरी लगेच वनडे संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे द्यायला हवे. कारण, तो विजय लगेच भूतकाळाचा भाग होऊन जातो. भविष्याचा विचार करता हार्दिकला पूर्ण सूट देत पुढील विश्वचषकाची तयारी करण्याची संधी देण्यात यावी.”
सध्या हार्दिक भारताच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार आहे. त्याला भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व करण्याचे देखील संधी मिळाली आहे. हार्दिकने मागील वर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना आपल्या पहिल्याच हंगामात संघाला विजेते बनवले. त्यानंतर यावर्षी दुसऱ्या हंगामात देखील तो संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. त्यामुळेच भविष्यातील भारतीय कर्णधार म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी त्याला टी20 संघाचा नियमित कर्णधार बनवण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, वनडे विश्वचषानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले.
(Ravi Shastri Wants Hardik Pandya As India Captain After 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
MPL: कोल्हापूर टस्कर्सचा नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय! मनोज-अंकित विजयाचे शिल्पकार
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे