भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे अनेक खेळाडू आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राउली आणि बेन डकेट अखेरच्या षटकात आमनेसामने आले. अखेरच्या षटकात इंग्लंडचे सलामी फलंदाज खेळ पुढे नेण्यात उशीर करत होते. ते मुद्दाम वेळ वाया घालवत होते.
या प्रकरणावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.
तिसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडचे सलामी फलंदाज वेळ वाया घालवत होते, जेणेकरून त्यांना दिवस संपेपर्यंत एकही धक्का बसू नये. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) चिडला आणि त्यांनी थेट जॅक क्राउली व बेन डकेटला सुनावले.
तसेच, इंग्लंडच्या खेळाडूंवर रवी शास्त्रीही (Ravi Shastri) संतापले. त्यांनी म्हटले, जर मी भारतीय संघात असतो, तर मीही हेच करत असतो. आम्ही याला तमाशा म्हणतो. खेळाच्या मैदानावर असंच काही घडत असतं आणि तुम्ही तेच बघू इच्छिता. तुम्ही फक्त गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, घरी जा’ असं म्हणू शकत नाही. थोडंफार वादविवाद चालतो, जोपर्यंत तुम्ही सीमारेषा ओलांडत नाही, तोपर्यंत मला काहीच अडचण नाही.
यादरम्यान, इंग्लंडचे गोलंदाजी सल्लागार टिम साऊदी यांनी आपल्या खेळाडूंचे समर्थन केले. त्यांनी म्हटले, मला माहिती नाही भारतीय खेळाडू कुठल्या गोष्टीची तक्रार करत होते, कारण काल दिवसाच्या मध्यात गिल स्वतः मसाज करून घ्यायला आडवा झाला होता. अर्थात, हे सगळं खेळाचाच एक भाग आहे. अखेरीस दोन्ही संघांचा जोश बघायला मिळणं नेहमीच रोमांचक असतं आणि हा दिवस संपवण्याचा एक उत्कंठावर्धक मार्ग होता. दोन्ही संघांची उर्जा पाहून छान वाटलं.





