चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव ८५.५ षटकात २८६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारत पहिल्या डावातील १९५ धावांची आघाडीसह ४८१ धावांनी पुढे असल्याने भारताने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे. भारताकडून आर अश्विनने शतकी खेळी करत खास विक्रम केले आहेत.
अश्विनने या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताला इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळण्यात यश आले. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून अश्विनने ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १४८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०६ धावा केल्या.
त्यामुळे तो पहिला असा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे, ज्याने तीनवेळा एकाच कसोटी सामन्यात शतकी खेळी आणि गोलंदाजीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याआधी विनू मंकड आणि पॉली उम्रीगर या भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटीत शतकी खेळी आणि गोलंदाजीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी प्रत्येकी १ वेळा केली आहे.
मंकड यांनी १९५२ ला इंग्लंडविरुद्ध आणि उम्रीगर यांनी १९६२ ला वेस्ट इंडिज विरुद्ध अशी कामगिरी केली आहे. तर अश्विनने यापूर्वी २०११ आणि २०१६ ला वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
इंग्लंडविरुद्ध ५५ वर्षांनंतर एकाच कसोटीत शतक आणि ५ विकेट्स –
आर अश्विन गेल्या ५५ वर्षांत इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी सामन्यात शतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी शेवटची अशी कामगिरी ५५ वर्षांपूर्वी हेडिंग्ले येथे सर गॅरी सोबर्स यांनी केली होती. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९६६ ला अशी कामगिरी करण्याचा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई कसोटीत विराटचे झुंजार अर्धशतक, गांगुलीला पछाडत ‘या’ स्थानी झेप
हे काय केलंस? इंग्लंडच्या खेळाडूंना भेटण्यासाठी भिडूने चढली तब्बल १२ मीटरची जाळी
चेन्नईचा सरंपच! अश्विनची ‘ही’ कामगिरी पाहून समलोचकांनी दिली भन्नाट उपमा, तुम्हीही असंच म्हणाल