भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. क्रिकेटच्या मैदानात आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघ पाकिस्तानव काही प्रमाणात का होईना वरचढ राहिला आहे. अनेकदा भारतीय संघासमोर पाकिस्तानला काहीही किंमत नसल्याचेही बोलले जाते. काही दिवासापूर्वी स्वतः पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनीही ही गोष्ट मान्य केली होती, पण सोबतच ते असेही म्हटले होते की, आता भारतीय संघ पाकिस्तानला इज्जत देऊ लागला आहे. असे असले तरी, भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने रमीज राजांना प्रत्युत्तर दिले.
मागच्या वर्षी म्हणजेच टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 WC 2021) मध्ये पाकिस्तानने भारताला 10 विकेट्स राखून पराभूत केले होते. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत भारताला धूळ चारली होती. त्यानंतर चालू वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषकात देखील पाकिस्तानने भारताला धूळ चारली होती. हे दोन्ही विजय पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांना असे वाटते की, आता कुठे भारताच्या नजरेत पाकिस्तानची इज्जत तयार झाली आहे.
“जेव्हा कधी भारतासोबत सामना असेल, तेव्हा पाकिस्तान संघ नेहमीच एका न्यूनगंडात राहिला आहे. पण उशिरा का असेना त्यांना आम्हाला सन्मान द्यायला सुरुवात केली आहे. मला असे वाटते की, पाकिस्तानला क्रेडिट मिळाले पाहिजे, कारण एका बिलियन डॉलर क्रिकेट इंडस्ट्रीला आम्ही हरवले आहे. मी स्वतः विश्वचषक खेळलो आहे. आम्हाला भारताला पराभूत करता आले नव्हते, पण या संघाला त्यांचे श्रेय मिळाले पाहिजे. कारण हे भारताच्या तुलनेत कमी संसाधनांमध्ये तयारी करून त्यांना कडवे आव्हान देतात,” असे रमीज राजा म्हणाले होते. त्यांची ही प्रतिक्रिया रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला मात्र पटली नाही, असेच दिसते.
माध्यमांशी बोलताना अश्विन म्हणाला, “विरोधकांचा सन्मान करणे ही अशी गोष्ट नाहीये, जी विजय किंवा पराभवाने ठरते. आम्ही नक्कीच त्या पाकिस्तान संघाचा सन्मान करतो. हे पाहा, हे क्रिकेट आहे. इथे स्पर्धा खूप मोठी आहे आणि दोन्ही देशांच्या लोकांसाठी ही गोष्ट खूप महत्वाची देखील आहे. पण दिवसाच्या शेवटी एक क्रिकेटपटू आणि हा खेळ खेळणाऱ्या एका व्यक्तीच्या रूपात, तुम्हाला समजते, विजय आणि पराभव खेळाचा भाग आहे. खासकरून टी-20 प्रकारात शेवट खूप जवळ असतो.” दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करायची आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबर-रिझवान न्यूझीलंडच्या बॉलिंगसमोर फेल, पाकिस्तानचा दारूण पराभव
ब्रेकिंग: बीसीसीआयचा नवा अध्यक्ष जाहीर! सौरव गांगुलीनंतर ‘हे’ सांभाळणार पदाचा कार्यभार






