मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मात दिली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात बंगलोरला ६९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह चेन्नईने पॉईंट्स टेबल मध्ये अव्वल स्थान गाठले.
चेन्नईच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजाचा सिंहाचा वाटा होता. त्याने फलंदाजीत आक्रमक अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर त्याने गोलंदाजीत देखील ३ बळी पटकावले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने एका खास यादीत त्याने स्थान मिळवले आहे.
जडेजाचे स्वप्नवत प्रदर्शन
रवींद्र जडेजासाठी हा सामना स्वप्नवत ठरला, असे म्हंटले तरी हरकत नाही. सर्वप्रथम त्याने फलंदाजीत योगदान देतांना २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत त्याने केलेल्या फटकेबाजीने चेन्नईची धावसंख्या २००च्या जवळपास पोहोचली. त्यानंतर गोलंदाजीत देखील आपली उपयुक्तता सिद्ध करतांना त्याने अवघ्या १३ धावांत ३ बळी घेतले. यात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या धोकादायक फलंदाजांचाही समावेश होता.
त्याच्या या कामगिरीने एका आयपीएलच्या सामन्यात ६० किंवा त्याहून अधिक धावा आणि ३ विकेट्स अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला. जडेजा आधी पॉल वल्थाटी आणि युवराज सिंग या दोघांनीच ही कामगिरी केली होती. पॉल वल्थाटीने डेक्कन चार्जर्स विरूद्ध खेळतांना ही कामगिरी केली होती. तर युवराज सिंगने एकदा दिल्ली विरूद्ध आणि एकदा राजस्थान विरूद्ध, अशी दोन वेळा ही कामगिरी केली होती. आता आजच्या सामन्यातील कामगिरीने जडेजाने देखील या यादीत स्थान मिळवले आहे.
एका आयपीएल सामन्यात ६० धावा व ३ विकेट्स –
१) पॉल वल्थाटी – वि. डेक्कन चार्जर्स
२) युवराज सिंग – वि. दिल्ली कॅपिटल्स
३) युवराज सिंग – वि. राजस्थान रॉयल्स
४) रवींद्र जडेजा – वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर*
चेन्नईचा सहज विजय
दरम्यान, चेन्नईने या सामन्यात बंगलोरवर सहज विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करतांना चेन्नईने ४ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना बंगलोरचा संघ २० षटकांत ९ बाद १२२ धावाच करू शकला. त्यामुळे चेन्नईला ६९ धावांनी विजय मिळाला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजाच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगलोरवर सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत चेन्नईने गाठले अव्वल स्थान, ‘या’ संघाची केली बरोबरी
जडेजाच्या वादळी खेळीमुळे एका षटकात ‘अशी’ कामगिरी करणारा चेन्नई ठरला दुसराच संघ