मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभूत केले. त्यामुळे बंगलोरचा यंदाच्या हंगामातील विजयरथ रोखल्या गेला. सलग चार सामन्यात विजय मिळविणाऱ्या बंगलोरला आज अखेर चेन्नईने मात दिली.
या सामन्यात चेन्नईने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना बंगलोरची बलाढ्य फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स सारखे दिग्गज फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. यंदाच्या हंगामात बंगलोरकडून सर्वाधिक धावा करणारा मॅक्सवेल या सामन्यात मात्र स्वस्तात बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला बाद केले.
जडेजाचा पाचव्यांदा झाला शिकार
ग्लेन मॅक्सवेलने डावाची चांगली सुरुवात केली होती. १४ चेंडूत २२ धावा झाल्या पाहून तो सेट झाला असे वाटत होते. मात्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू थेट यष्टयांवर जाऊन आदळला. त्यामुळे मॅक्सवेलला स्वस्तात माघारी परतावे लागले.
या विकेटसह जडेजाने आयपीएल मध्ये तब्बल पाचव्यांदा मॅक्सवेलला बाद केले. यासह मॅक्सवेलचा जडेजा विरूद्धचा खराब रेकॉर्ड कायम राहिला. आत्तापर्यंत जडेजाच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने ३६ चेंडू खेळले असून यावर केवळ ४३ धावा काढल्या आहेत. तर या दरम्यान तो तब्बल ५ वेळा बाद झाला आहे. मॅक्सवेलचा जडेजा विरूद्धचा स्ट्राईक रेट अवघा ११९.४४ इतका आहे.
चेन्नईचा सहज विजय
दरम्यान, चेन्नईने या सामन्यात बंगलोरवर सहज विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करतांना चेन्नईने ४ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना बंगलोरचा संघ २० षटकांत ९ बाद १२२ धावाच करू शकला. त्यामुळे चेन्नईला ६९ धावांनी विजय मिळाला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजाच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
महत्वाच्या बातम्या:
CSK vs RCB : जडेजा पडला आख्ख्या आरसीबी संघावर भारी! चेन्नईचा बेंगलोरवर ६९ धावांनी दमदार विजय
सर जडेजाने केली हर्षल पटेलची धुलाई, एकाच षटकात ३६ धावा कुटत घातली या विक्रमाला गवसणी






