पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह त्यांनी मालिकेत १-१ ची बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयात अष्टपैलू रविंद्र जडेजाचा मोलाचा वाटा राहिला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर जडेजाने बॉक्सिंग डे कसोटीद्वारे पुनरागमन केले आणि स्वत:मधील क्षमतेला सिद्धही करून दाखवले.
या डावखुऱ्या फलंदाजाने बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात ५७ धावांची खेळी केली होती. तसेच भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत मिळून शतकी भागिदारीही साकारली. एवढेच नव्हे तर, गोलंदाजी करताना तीन विकेट्सही घेतल्या. त्याच्या या कामगिरीला पाहता माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी जडेजाची पाठ थोपटली आहे.
जडेजाला चौथ्या स्थानावर संधी मिळावी
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना दासगुप्ता म्हणाले की, “जडेजा सध्या ज्या अंदाजात फलंदाजी करत आहे. ते पाहून मला असे की, तो अष्टपैलूंच्या त्या यादीत येतो ज्यामध्ये बेन स्टोक्सचा समावेश आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिशतक करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळायला हवी. देशांतर्गत क्रिकेटमधील सौराष्ट्र संघाकडून खेळताना तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. पण भारतीय संघाकडून खेळताना त्याला सातव्या किंवा आठव्या स्थानी पाठवले जाते.”
जडेजाने फलंदाजी प्रदर्शनात केले बदल
“मला आधी वाटायचे की, जडेजा त्याच्या फलंदाजीला गांभिर्याने घेत नाही. पण २०१७ मध्ये त्याला संघाबाहेर केल्यानंतर त्याने स्वत:ला उपयोगी खेळाडू बनवण्यावर जास्त भर दिला. त्याला फलंदाजीसह गोलंदाजीतही स्वत:ला पारंगत बनवायचे होते,” असे पुढे बोलताना दासगुप्ता यांनी सांगितले.
जडेजाच्या प्रदर्शनातील प्रगतीविषयी बोलताना दासगुप्ता म्हणाले की, “जडेजा नेहमीच चांगली क्षमता असलेला खेळाडू राहिला आहे. पण आता विरुद्ध संघाला त्याला बाद करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. २०१६ पासून त्याचे प्रदर्शन पाहिले तर, त्याची फलंदाजी सरासरी (४६.२९) आणि गोलंदाजी सरासरी (२४.९७) सर्वाधिक राहिली आहे. गेल्या काही वर्षात त्याने आपल्या फलंदाजीत खूप सुधारणा केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना काळात गोलंदाजांसाठी ‘ही’ गोष्ट सर्वात कठीण, मार्क बाऊचरने मांडले मत
न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पाय फ्रॅक्चर झाला असूनही केलं होतं गोलंदाजीचं धाडस
“मी तर केवळ फलंदाज अजिंक्य रहाणेला घडवलं, पण तो कर्णधार झाल्याचे श्रेय त्यालाच”