भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे सध्या जगभरातून कौतुक होत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (First Test) फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार खेळ दाखवला आहे. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार (Man Of The Match Award) देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार जिंकत त्याने मोहालीच्या मैदानावर अनोखी हॅट्रिक घेतली (Hattrick Of Winning MOM On Mohali) आहे.
जडेजाचे मोहाली कसोटीत अष्टपैलू प्रदर्शन
जडेजाने श्रीलंकेविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद १७५ धावा केल्या. २२८ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. जडेजाच्या या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला ५७५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव सुरू असतानाही जडेजाने दमदार खेळ दाखवला. त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना केवळ ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावातही त्याचे शानदार गोलंदाजी प्रदर्शन सुरूच राहिले. या डावात त्याने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. १६ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात जडेजाने ८७ धावांवर ९ विकेट्स घेण्याची विलक्षण कामगिरी केली.
मोहालीच्या मैदानात केली अनोखी हॅट्रिक
फलंदाजी आणि गोलंदाजीतील शानदार प्रदर्शनासाठी जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोहालीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात जडेजाला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर निवडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याला मोहालीच्या मैदानावर हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे, त्याने मोहाली कसोटीत सामनावीर बनण्याच्या बाबतीत हॅट्रिक केली आहे.
यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध जडेजा सामनावीर बनला होता. हे दोन्हीही सामने मोहालीच्याच मैदानावर झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ३८ धावा आणि ८ विकेट्सची कामगिरी केली होती. तर इंग्लंडविरुद्ध त्याने ९० धावा आणि ४ विकेट्सचे योगदान दिले होते.
मोहालीत जडेजाचे प्रदर्शन नेहमीच राहिलेय शानदार
क्रिकेटच्या तिन्ही विभागात जडेजाचे नाणे खणखणीत वाजताना दिसले. त्यातही मोहालीच्या मैदानापासून तर त्याला खूप मदत मिळते. जडेजाने या मैदानावर आतापर्यंत ६ कसोटी डाव खेळताना ३२७ धावा केल्या आहेत. मोहालीत सर्वाधिक धावा करण्याच्या कामगिरीत रनमशीन विराट कोहलीही जडेजाच्या मागे आहे. तसेच या मैदानावर त्याने ८ डावांमध्ये गोलंदाजी करताना २७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ
‘मोहाली कसोटी जडेजासाठी ओळखली जाईल’, भारताच्या मोठ्या विजयानंतर माजी क्रिकेटरची स्तुतीसुमने
मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण