भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारताने चांगली कामगिरी केली. मात्र, दुसऱ्या डावाच्या सुरुवातीपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले. भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा शून्य धावांवर ( डक ) बाद झाला.
अष्टपैलू रवींद्र जडेजाने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाच्या वेळी चांगले प्रदर्शन केले आहे. कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा होती. पण तो शून्य धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने त्याला एलबीडब्ल्यू बाद केले. यापूर्वी पहिल्या डावात देखील साउदीनेच रवींद्र जडेजाला क्लीन बोल्ड केले होते. पहिल्या डावात जडेजाने अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान, जडेजा बऱ्याच काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला आहे.
जडेजाच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला तर, तो यामध्ये केवळ पाच वेळा शून्य धावासंख्येवर बाद झाला आहे. त्याने आतापर्यंत ५७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सर्वात पहिल्यांदा २०१३ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या डरबन कसोटीत शून्य धावांवर बाद झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅंचेस्टर कसोटीमध्ये तो दुसऱ्यांदा शून्य धावांवर बाद झाला. २०१६ मध्ये विशाखापट्टणम मध्ये त्याने पुन्हा अशीच निराशाजनक कामगिरी केली. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये तो चौध्यांदा शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर आता जवळपास तीन वर्षांनी तो न्यूझीलंडविरुद्ध शून्य धावांवर बाद झाला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात पहिल्यांदाच झाला डक
ही पहिली वेळ आहे जेव्हा जडेजा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शून्य धावांवर बाद झाला आहे. कानपूर कसोटीत त्याने ही नकोशी कामगिरी केली आहे. तसेच, तो कसोटी कारकिर्दी ज्या पाच वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे, त्यापैकी चार वेळा पायचित आणि एकदा झेलबाद झाला आहे. त्याला आतार्यंत जेपी डुमिनी (झेलबाद), जेम्स एंडरसन, मोईन अली, जेसन होल्डर, आणि आता साऊदीने शून्यावर बाद केले आहे.
जागतित कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच झाला डक
न्यूझीलंडविरुद्ध खेळली जाणारी ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. जडेजा यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जेवढे सामने खेळला आहे, त्यामध्ये एकदाही शून्य धावांवर बाद झाला नव्हता. पण या सामन्यात त्याचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. जडेजाच्या एकंदरीत कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने ५७ कसोटी सामन्यांमध्ये ३३.७६ च्या सरासरीने २१९५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे एक शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०० आहे. तसेच त्याने २२७ विकेट्सही घेतल्या आहेत.