इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २९ वा सामना रविवारी (दि. १७ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात गुजरातने एक चेंडू राखत ३ विकेट्सने विजय मिळवला. यासह गुजरातने हंगामातील पाचवा विजय मिळवला. तर, चेन्नईचा हा सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला. या पराभवानंतर बोलताना चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
असा रंगला सामना
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा उभारल्या. हंगामात ऋतुराज गायकवाडने प्रथमच अर्धशतक साजरे केले. तर अंबाती रायडू व कर्णधार रवींद्र जडेजाने आक्रमक खेळ केला. प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी आपले पहिले पाच बळी खुप लवकर गमावले. मात्र, डेव्हिड मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत ९४ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभारी कर्णधार राशिद खानने आक्रमक ४० धावांचे योगदान दिले. यासह गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहिले आहे.
काय म्हणाला जडेजा?
गुजरातला विजयासाठी अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन या धावांचा बचाव करू शकला नाही. यानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा प्रतिक्रिया देताना म्हणाला,
“आम्ही पहिल्या पावर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. पंधराव्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात पुढे होतो. पण शेवटच्या पाच षटकांत सामना आमच्या हातून निसटला. मला वाटले होते जॉर्डन चांगले यॉर्कर टाकून त्यांच्यावर दबाव टाकेल. परंतू, असं काही होऊ शकलं नाही. हेच या खेळाचे सौंदर्य आहे.”
चेन्नईचा हा पाचवा पराभव असल्याने त्यांना आता उर्वरित ८ पैकी सात सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा ते प्ले ऑफपर्यंत पोहचू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर केएल राहूल
झेल पकडणं सोडा, साधे प्रयत्नही नाही केले! गुजरातच्या मॅच विनरचा कॅच सोडणाऱ्या दुबेवर भडकला जडेजा