---Advertisement---

MPL 2025 मध्ये अवतरला सुपरमॅन! हा झेल पाहून तुम्हीही असंच म्हणाल

On: मंगळवार, जून 10, 2025 7:40 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये 10 जून रोजी रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा ‘कोकण डर्बी’ सामना खेळला गेला. या सामन्यात रत्नागिरी जेट्सने खेळ कमालीचा उंचावत 67 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यात रायगडचा फलंदाज रवींद्र जाधव याने टिपलेल्या एका झेलाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

रत्नागिरी जेट्स संघाला या सामन्यात रायगड रॉयल्सने फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.‌ रत्नागिरीचे सलामीवीर धीरज फटांगरे व अथर्व धर्माधिकारी यांनी संघाला 60 धावांची सलामी दिलेली. अथर्व बाद झाल्यानंतर धीरज व कर्णधार अझीम काझी यांनी पुन्हा 46 धावांची भागीदारी केली. यादरम्यान धीरजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 43 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या.

धीरज व काझी यांच्यातील भागीदारी मोठी होत असताना हितेश वाळुंज टाकत असलेल्या षटकात धीरज याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर्सच्या डोक्यावरून त्याने चौकार मारण्याचा प्रयत्न केला असताना, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवींद्र जाधव याने हवेत झेप घेतली. संपूर्ण शरीर हवेत झोकून देत त्याने हा झेल पूर्ण केला. त्याच्या या झेलानंतर सोशल मीडियावर त्याची तुलना थेट भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजाशी केली जात आहे. तर, काही चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला भारताचा ग्लेन फिलिप्स म्हणून नवे नाव दिले.

या सामन्याचा विचार केला गेला तर रत्नागिरी जेट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा उभ्या केल्या होत्या. धीरज फटांगरे व कर्णधार ‌अझीम काझी यांनी शानदार अर्धशतके झळकावली. विजयासाठी मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रायगडचा डाव सुरुवातीपासूनच डगमगला. त्यांचा एकही फलंदाज 20 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. सत्यजित बच्छाव व प्रदीप दाढे यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे रत्नागिरीने हंगामातील आपला दुसरा विजय संपादन केला. तर, रायगडचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---