मुंबई । विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज देखील आहेत. पण जेव्हा आयपीएल परदेशात खेळले जात तेव्हा हे दोन फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अयशस्वी ठरतात.
कोविड -19 साथीमुळे या वेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होईल. भारताची ही देशांतर्गत स्पर्धा परदेशी भूमीवर खेळली जाण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकांमुळे संपूर्ण स्पर्धा 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत तर 2014 मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा युएईमध्ये खेळला गेला होता. या दोन्हीप्रसंगी कोहली आणि रोहितला त्यांच्या कीर्तीनुसार कामगिरी करता आली नाही.
आयपीएलमध्ये परदेशात खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये कोहलीने 23.40च्या सरासरीने 351 धावा केल्या, त्यामध्ये केवळ एका अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलमध्ये कोहलीने आतापर्यंत 177 सामने खेळले आहेत. यामध्ये 5 शतके आणि 36 अर्धशतकांसह 37.84 च्या सरासरीने 5 हजार 412 धावा केल्या आहेत. त्याने भारतात खेळलेल्या 156 सामन्यांपैकी त्याने 39.53 च्या सरासरीने 5 हजार 61 धावा केल्या, त्याशिवाय त्याने आपल्या देशात 5 शतकांसह 35 अर्धशतके झळकावली आहेत.
आयपीएलच्या सुरूवातीपासूनच कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याने 16 सामन्यात 22.36 च्या सरासरीने एका अर्धशतकांसह 246 आणि युएईमध्ये 2014 मध्ये झालेल्या 5 सामन्यात 105 धावा केल्या. या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या नऊ डावांमध्ये त्याने दोन अर्धशतकांच्या मदतीने 254 धावा ठोकण्यात यश मिळवले.
आयपीएलमध्ये रोहितने 188 सामन्यात 31.60 च्या सरासरीने 4 हजार 898 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहली आणि सुरेश रैना नंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो तिसर्या क्रमांकावर आहे.
रोहितने विदेशात खेळताना 446 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये आतापर्यंत एकूण 21 सामने खेळले आहेत आणि यामध्ये दोन अर्धशतक ठोकली आहेत. त्याने 24.77 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 2009 मध्ये रोहित हा डेक्कन चार्जर्सचा एक भाग होता. त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेत त्याने अर्धशतकाच्या मदतीने 16 सामन्यात 362 धावा केल्या.
पाच वर्षांनंतर, युएईमध्ये, मात्र त्याला मुंबई इंडियन्सकडून पाच सामन्यांत 84 धावाच करता आल्या. यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळलेल्या 50 धावांच्या खेळीचा देखील समावेश आहे. उर्वरित चार सामन्यात रोहितला केवळ 34 धावा करता आल्या. त्यानंतर घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसर्या टप्प्यात त्याने दहा सामन्यांत 306 धावा करुन त्याची आकडेवारी सुधारली.