रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अर्थात आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतो आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७ सामन्यात त्यांनी ५ विजय मिळवले असून २ पराभव पत्करले आहेत. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये सध्या तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे.
मात्र चांगला फॉर्म असला तरी काही खेळाडूंच्या कामगिरीची चिंता आरसीबीला भेडसावते आहे. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे आरसीबीचा हुकमी एक्का लेगस्पिनर युझवेंद्र चहल. चहलची यंदाच्या हंगामातील कामगिरी फारशी खास नाही आहे. अशा परिस्थितीत त्याचे संघातील स्थान धोक्यात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता आरसीबीच्या प्रशिक्षकांनीच उत्तर दिले आहे.
चहलचा हरवला आहे फॉर्म
गेल्या काही महिन्यांपासून युझवेंद्र चहलचा फॉर्म हरवल्याचे दिसून येते आहे. भारताकडून खेळतांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात त्याला काही काळापासून अपयश आले आहे. याचाच परिणाम म्हणून बीसीसीआयच्या वार्षिक करारात त्याची एका श्रेणीने घसरण देखील झाली होती. आता यंदाच्या आयपीएल हंगामात देखील तो संघर्ष करतांना दिसून येतो आहे. या हंगामात आरसीबीकडून ७ सामन्यात त्याने ८.२६च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. तर या दरम्यान त्याला केवळ ४ विकेट्स पटकवण्यात यश आले आहे. यामुळेच त्याच्या संघातील स्थानावर शंका उपस्थित केली जात आहे.
प्रशिक्षकांनी केली भूमिका स्पष्ट
आरसीबीला कालच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आरसीबीचे प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी चहलच्या संघातील स्थानाबद्दल भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्ही असं म्हणणार नाही की त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे. पंजाबच्या फिरकीपटूंनी कालच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र आमच्या फिरकीपटूंना खेळपट्टीचा फारसा लाभ उठवता आला नाही. अर्थात चहलला पहिल्या षटकात भरपूर धावा चोपल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याने चांगले पुनरागमन केले.”
पंजाब विरूद्धच्या पराभवबाबत देखील कॅटिच यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आमच्यासाठी हा सामना निराशाजनक होता. मात्र चांगली गोष्ट ही आहे की आम्ही पुनरागमन करायला देखील शिकतो आहे. आम्ही कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या पुढच्या सामन्यात दमदार पुनरागमन करू आणि निश्चितच तो सामना जिंकून विजयी लय परत मिळवू.”
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या गोडव्यात पंजाब किंग्जसाठी कडवी बातमी, पडीक्कलला बोल्ड करणारा हा गोलंदाज दुखापतग्रस्त