आयपीएल 2020 मध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल. अबुधाबीतील उष्ण वातावरणात खेळणे या दोन्ही संघासाठी मोठे आव्हान असेल.
राजस्थान विजययाच्या मार्गावर येण्यास आहे तयार
राजस्थान रॉयल्सने शारजाह येथील छोट्या मैदानावर या हंगामातील आपले पहिले दोन सामने खेळले आहे. त्या दोन्ही सामन्यात त्यांना विजयाची चव चाखायला मिळाली. त्यानंतर दुबईतील मोठ्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध झालेल्या त्यांच्या तिसऱ्या सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अबू धाबीचे मैदानही मोठे आहे. पण आज राजस्थानला दुबईच्या मोठ्या मैदानात खेळण्याचा फायदा नक्कीच होईल.
वरून एरॉनला मिळू शकते संधी
राजस्थानच्या फलंदाजांनी शारजाहमध्ये चांगलीच फटकेबाजी केली होती पण दुबईत केकेआरविरुद्ध 175 धावांचे लक्ष्य गाठण्यात त्यांना अपयश आले होते. परदेशी खेळाडूं चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण आज वेगवान गोलंदाज अंकित राजपूतच्या जागी वरुण एरॉनला अंतिम ११ जणांच्या संघामध्ये संधी मिळू शकते.
यशस्वी जयस्वालला संघात घेण्याची होत आहे मागणी
चाहत्यांकडून युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला संघात स्थान देण्याची मागणी होत आहे. यशस्वी संघात आल्यास यष्टिरक्षक फलंदाज जॉस बटलरला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल.
आरसीबीसाठी डेथ ओव्हर मधील गोलंदाजी आहे चिंतेचा विषय
राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या दोघांनी आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. आरसीबीने या हंगामात चांगली सुरुवात केली परंतु त्यांना क्षेत्ररक्षण व शेवटच्या षटकांमधील गोलंदाजीत त्यांना सुधारणा करण्याची गरज आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नवदीप सैनीने चांगली गोलंदाजी केली; त्यामुळे संघाला दोन गुण मिळविण्यास मदत झाली. परंतु या सामन्यात आरसीबीने शेवटच्या चार षटकांत 79 धावा दिल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या षटकांमधील गोलंदाजी या संघासाठी चिंतेचा विषय असेल.
आरसीबी संघात होणार नाही बदल
आरसीबीने शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इसुरु उदाना, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पा आणि अष्टपैलू गुरकीरत मान यांना संघात स्थान दिले होते आणि ते आजही अंतिम ११जणांच्या संघामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात फिरकीपटूं वॉशिंग्टन सुंदरने डावाचे पहिले षटक टाकले होते. त्याने चार षटकांत केवळ 12 धावा देऊन एक गडी बाद केला होता. आरसीबीचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्सही शानदार फॉर्ममध्ये आहे. तर शिवम दुबेनेही शेवटच्या सामन्यात मोठे फटके खेळून आपले कौशल्य दाखवले होते. त्यामुळे शेवटच्या षटकातील गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण अशा काही त्रुटी सोडल्या तर संघातील काही खेळाडूंची जबरदस्त कामगिरी संघाचा आत्मविश्वास वाढवत आहे. याबरोबरच आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न करेल. त्याने आतापर्यंत तीन सामन्यात केवळ 18 धावा केल्या आहेत.
संघ –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, पार्थिव पटेल, एरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरतसिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, अॅडम झाम्पा.
राजस्थान रॉयल्स:
जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल अनुज रावत, आकाश सिंग, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण एरॉन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर.