अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिषभ पंत आणि शिम्रोन हेटमायर यांनी दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांची झुंज अपुरी पडली. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात १४ धावांचा बचाव करत आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला.
पहिल्या डावात एबी डिव्हिलियर्सचे अर्धशतक
एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात आरसीबीने सन्मानजनक धावसंख्या उभारली. एकवेळ ३ बाद ६० असा आरसीबीचा डाव अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर डिव्हिलियर्सने तडाखेबंद अर्धशतक झळकवत आरसीबीची धावसंख्या २० षटकांअखेर ५ बाद १७१ पर्यंत पोहोचवली. त्यामुळे दिल्लीला आता जिंकण्यासाठी १७२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
एबी डिव्हिलियर्सने या डावात सुरुवातीला सावध सुरुवात केली होती. त्याने चौथ्या विकेटसाठी रजत पट्टीदारसह ५४ धावांची भागीदारी केली. तर पाचव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह २५ धावांची भागीदारी केली. डिव्हिलियर्सने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याला रजत पट्टीदारने २२ चेंडूत ३१ धावा करत साथ दिली. दिल्लीकडून सगळया प्रमुख गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सलामीला अडखळत सुरुवात
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात दमदार सुरुवातीनंतर आरसीबीचा डाव अडखळला आहे. देवदत्त पड्डीकल आणि विराट कोहलीने सलामीला येत ३० धावांची सलामी दिली होती. हे दोघेही चांगल्या लयीत असल्याचे दिसत होते. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने विराट कोहलीला बाद केले. यांनतर पुढच्याच षटकात अनुभवी इशांत शर्माने देवदत्त पड्डीकलला बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.
यामुळे आरसीबीचा डाव २ बाद ३० असा अडचणीत सापडला होता. मात्र त्यांनतर ग्लेन मॅक्सवेलने रजत पट्टीदारच्या साथीने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. ही जोडी आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाणार असे वाटत असतानाच ग्लेन मॅक्सवेल अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा नादात बाद झाला. त्यामुळे १० षटकाअखेर त्यांची ३ बाद ६८ अशी अवस्था आहे.
नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय
तत्पूर्वी, या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी आरसीबीने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी अष्टपैलू डॅनियल ख्रिस्टियनच्या जागी डॅनियल सॅम्सला संधी दिली आहे. तर नवदीप सैनीच्या जागी रजत पट्टीदारला संधी मिळाली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने एक बदल केला आहे. आर अश्विनने आयपीएलमधून तात्पुरता ब्रेक घेतल्याने त्याच्या जागी इशांत शर्माला संधी दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, रजत पट्टीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, कायले जेमिसन, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज
दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, आवेश खान, इशांत शर्मा