बुधवारी (०५ मे) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेला सामना चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) १३ धावांनी गमावला. सीएसकेचा हा आयपीएल २०२२मधील सातवा पराभव आहे. या सामना पराभवासह सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मुंबई इंडियन्सपाठोपाठ प्लेऑफमधून बाहेर होणारा सीएसके दुसरा संघ आहे. हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच बॅकफूटवर राहिलेल्या सीएसकेच्या या अवस्थेसाठी त्यांचे काही निर्णय जबाबदार ठरले (Reasons Behind CSK Out From Play Off). त्यांचाच या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. मेगा लिलावात प्रमुख खेळाडूंना गमावणे-
गतवर्षी अर्थात २०२१ साली सीएसकेने आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. हे त्यांनी मिळवलेले विक्रमी चौथे विजेतेपद होते. सीएसकेला आयपीएल चषक जिंकून देण्यात संघातील काही प्रमुख खेळाडूंचा हात होता, ज्यामध्ये फाफ डू प्लेसिस, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवुड यांचा समावेश होतो. फाफने सीएसकेसाठी हंगामातील सर्व १६ सामने खेळताना ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा केल्या होत्या. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता.
तसेच शार्दुल व मिळालेल्या संधीत शानदार प्रदर्शन करणाऱ्या हेजलवुडनेही संघाला बरेचसे सामने जिंकून दिले होते. शार्दुलने १६ सामन्यांमध्ये २१ व हेजलवुडने ९ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु सीएसकेने आयपीएल २०२२साठीच्या मेगा लिलावात या आधारस्तंभानाच गमावले. परिणामी सीएसकेचा संघ कमजोर पडला.
हेही वाचा – एमएस धोनीमुळेच चेन्नई प्लेऑफमधून गेली बाहेर? ‘या’ खेळाडूला बाहेर करणं पडलं महागात
२. रविंद्र जडेजाकडे नेतृत्त्वाची धुरा-
सीएसकेचा अनुभवी कर्णधार एमएस धोनीचे वाढते वय पाहता, संघाने अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या खांद्यावर नेतृत्त्वाचा भार सोपवला होता. महत्त्वाचे म्हणजे, हंगामाला सुरुवात होण्याच्या ४८ तासांआधीच जडेजावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र जडेजाकडे नेतृत्त्वाचा पुरेसा अनुभव नसल्याने तो हे शिवधनुष्य पेलू शकला नाही. यापूर्वी जडेजाने फक्त अंडर १९ क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्त्व केले होते, तो २००८ मध्ये अंडर १९ क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचा उपकर्णधार होता.
याचमुळे अनुभवहीन जडेजावर कर्णधारपदाचा दबाव आला आणि त्याचे वैयक्तिक प्रदर्शनही खालावले. त्यामुळे सीएसकेचा हा निर्णय पुरता फसला, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
३. रिटेन केलेल्या खेळाडूंचे अपयश-
सीएसकेने हंगाम सुरू होण्यापूर्वी रिटेंशन प्रक्रियेत भरपूर पैसे खर्च केले होते. त्यांनी जडेजाला सर्वाधिक १६ कोटींसह संघात कायम ठेवले होते. त्याच्याबरोबर धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी) आणि ऋतुराज कॅप (६ कोटी) हे खेळाडू सीएसकेने रिटेन केले होते. परंतु मागील हंगामात चमकदार कामगिरी करणारे हे खेळाडू या हंगामात पुरते फ्लॉप ठरले.
अष्टपैलू जडेजा चालू हंगामात एकाही विभागात विशेष योगदान देऊ शकला नाही. आतापर्यंत १० सामने खेळताना तो १९.३३ च्या सरासरीने फक्त ११६ धावा करू शकला आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी फक्त २६ धावा इतकी राहिली आहे. याशिवाय गोलंदाजीतही त्याने केवळ ५ विकेट्सची कामगिरी केली आहे. क्षेत्ररक्षणातही त्याच्याकडून भरपूर चुका होताना दिसत आहेत. दुसरीकडे आयपीएल २०२१चा ऑरेंज कॅप विनर ऋतुराजही सपशेल फेल ठरला आहे. त्याला साधे अर्धशतक करण्यासाठी ६ सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली आहे. त्याने आतापर्यंत १० सामने खेळताना २६.५०च्या सरासरीने २६५ धावाच केल्या आहेत.
४. ढिसाळ क्षेत्ररक्षण-
फलंदाजी आणि गोलंदाजीतील सुमार प्रदर्शनाबरोबरच सीएसकेच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणातही भरपूर चुका झाल्या आहेत. त्यांचा एकवेळचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या जडेजानेच या हंगामात सोपे झेल सोडले आहेत. आतापर्यंत सीएसकेच्या खेळाडूंनी एकूण २१ झेल सोडले आहेत, ज्याचा परिणाम त्यांना सामना पराभवाच्या रूपात भोगावा लागला आहे.
५. दिपक चाहरची दुखापत-
सीएसकेच्या अपयशामागे कुठे-ना-कुठे दिपक चाहरची दुखापतही जबाबदार ठरली. पावरप्लेमध्ये महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, जी त्याने गतवर्षी योग्यरित्या पारही पाडली होती. परंतु आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान चाहर दुखापतग्रस्त झाला होता. तसेच पुढे बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर काम करत असताना त्याच्या जुन्या पाठीच्या दुखण्याने डोके वर काढले आणि तो एकही सामना न खेळता संपूर्ण हंगामातून बाहेर झाला.
चाहरच्या कमीमुळे सीएसकेचा वेगवान गोलंदाजी विभाग कमजोर बनला. थोड्याफार प्रमाणात मुकेश चौधरी पावरप्लेमध्ये संघाला विकेट्स मिळवून देण्याचे काम करतोय. परंतु सिमरजीत सिंग, ड्वेन प्रटोरियस, ख्रिस जॉर्डन हे वेगवान गोलंदाज त्यांची जादू दाखवण्यात कमी पडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्यात धावा करण्याची इच्छाही दिसत नाही’, महान क्रिकेटरने विराटच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना
फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’