पाकिस्तान क्रिकेट संघ वनडे विश्वचषकाच्या इतिहासात 8व्यांदा भारताचा सामना करत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी पाकिस्तान संघाच्या वरच्या फळीतील तीन फलंदाजांनी 20 हून अधिक धावा करत भारताविरुद्ध खास विक्रम केला.
पाकिस्तानचा विक्रम
झाले असे की, पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी इमाम उल हक (Imam Ul Haq) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) क्रीझवर आले होते. यावेळी त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मात्र, त्यांनी 20 किंवा त्याहून अधिक धावा सहजरीत्या केल्या. यावेळी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शफीकला 8व्या षटकातील सहाव्या चेंडूवर पायचीत बाद करत तंबूत पाठवले. तो 20 धावांवर बाद झाला.
त्याच्यानंतर इमाम उल हक हा 36 धावांवर खेळत असताना 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याला केएल राहुल (KL Rahul) याच्या हातून झेलबाद केले. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही 27व्या षटकापर्यंत खेळताना 49 चेंडूत 37 धावा केल्या.
त्यामुळे विश्वचषकात भारताविरुद्धच्या 8व्या सामन्यात खेळताना पाकिस्तानच्या पहिल्या 3 फलंदाजांनी 20 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
विश्वचषकात भारताविरुद्धच्या 8व्या सामन्यात पाकिस्तान संघाचे पहिले 3 फलंदाज
20 धावा- अब्दुल्ला शफीक
36 धावा- इमाम उल हक
37 धावा- बाबर आझम*
पाकिस्तान सर्व सामन्यात पराभूत
पाकिस्तानने हा जरी विक्रम केला असला, तरीही वनडे विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानला प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आतापर्यंत विश्वचषकातील 7 सामने खेळले गेले आहेत. या सातही सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. अशात आठव्या सामन्यातही पाकिस्तानला पराभूत करण्याचा भारताचा मानस असेल. (record First time Pakistan’s top-3 have all scored more than 20 in their 8 World Cup matches against India)
हेही वाचा-
रोहितचा पाकिस्तानविरुद्ध अनोखा विक्रम! विश्वचषकात बदलून टाकला भारताचा इतिहास, काय केलंय वाचाच
अर्रर्र…मोठी चूक! INDvsPAK सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, फोटो जोरदार व्हायरल