शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२०चा ३२वा सामना झाला. त्यापुर्वी कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने कर्णधारपदाचा राजीनामा देत सर्वांना धक्का दिला. त्यामुळे ओएन मॉर्गन या सामन्यात संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळताना दिसला.
पण २०१८ पासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत असलेल्या कार्तिकने कशामुळे हा निर्णय घेतला असावा? आतापर्यंत त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाचे प्रदर्शन कसे राहिले असेल? तसेच त्याचे वैयक्तिक प्रदर्शन कसे राहिले?, या सर्व गोष्टींचा येथे आढावा घेतला आहे.
गुणतालिकेत संघ चौथ्या स्थानावर
आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या मध्यांतरानंतर कोलकाता संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. कोलकाताने या हंगामात आत्तापर्यंत कार्तिकच्या नेतृत्वाखाली ७ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान या ७ सामन्यात कार्तिकने १५.४२ च्या सरासरीने १०८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
गेल्या २ वर्षांतील संघाची आणि कार्तिकची कामगिरी
२०१८ साली ७.४ कोटीची बोली लावत कोलकाता संघाने कार्तिकला विकत घेतले होते. एवढेच नाही तर, संघ व्यवस्थापनाने त्याला गौतम गंभीरच्या जागी संघाचा कर्णधारही बनवले होते. २०१८च्या हंगामात कार्तिक आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला प्ले ऑफपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरला. पण २०१९ ला मात्र त्याला यात यश आले नाही. २०१८ साली संघ गुणतालिकेत तिसऱ्या, तर २०१९ साली ५व्या स्थानावर होता.
या २ वर्षात कार्तिकची वैयक्तिक फलंदाजी प्रशंसनीय राहिली होती. त्याने १४६च्या उल्लेखनीय स्ट्राईक रेटने ८५९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश होता.
रसेल कार्तिकच्या नेतृत्त्वाशी होता असहमत
जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणला जाणारा आंद्रे रसेल बऱ्याचदा कार्तिकच्या मतांशी असहमत असल्याचे दिसून आला आहे. चौकार-षटकार लगावत विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या रसेलची वरच्या फळीत फलंदाजी करण्याची इच्छा होती. पण कार्तिकने त्याला जास्त संधी दिल्या नाहीत. त्यामुळे तो बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे कार्तिकने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करताना दिसायचा.
संघ व्यवस्थापनाचा दबाव असण्याची शक्यता
२०१८ साली कोलकाता संघ व्यवस्थापननाने कार्तिकच्या खांद्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांना अपेक्षा होत्या की, त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगले प्रदर्शन करेल आणि तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल्या संघाचे नाव कोरेल. पण असे झाले नाही. त्यामुळे कदाचित यावर्षी संघ व्यवस्थापनाचा कार्तिकवर अधिक दबाव असावा आणि त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे.
कारण जेव्हा गंभीर कोलकाताचा कर्णधार होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, “त्याने संघाला २ वेळा ट्रॉफी जिंकून दिली, पण संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर इतका दबाव असायचा की त्याला रात्र-रात्र झोप येत नसे.”
रणनितीमुळे होत होती टीका
या हंगामात आत्तापर्यंत कोलकाताने खेळलेल्या ७ सामन्यांत बऱ्याचदा कार्तिकच्या रणनितीवर टीका झाली आहे. त्याने शारजाहसारख्या धिम्या खेळपट्टीवर दमदार फिरकीपटू कुलदिप यादवला संधी दिली नव्हती. तसेच किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांना संकटात टाकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाऐवजी त्याने वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीला गोलंदाजीला पाठवले होते. त्यामुळे कार्तिकच्या निर्णयांची बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी निंदा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ये हुई ना बात! सूर्यकुमारची ‘स्काय’ जंप आणि केकेआर चिंतेत, पाहा व्हिडिओ
‘वारसा नष्ट करायला एक मिनिट पुरेसा’, कोलकाताच्या नेतृत्व बदलानंतर गंभीरचं ट्विट व्हायरल
पैज लावून सांगतो, क्रिकेटचा असा व्हिडीओ तुम्ही यापुर्वी पाहिला नसेल
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण