इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. आता या स्पर्धेचा उर्वरित हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी होऊ शकतात. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. परंतु ज्या खेळाडूंनी स्वतःला बांगलादेश आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर ठेवले आहे. ते खेळाडू आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी हजेरी लावू शकतात. क्रिकबजच्या वृत्तानुसार, कमीत कमी २० खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित हंगामात खेळताना दिसून येऊ शकतात.
पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, झाय रिचर्डसन, मार्क स्टोइनिस आणि डेनियल सॅम्स यांनी वैयक्तिक कारणास्तव वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावरून आपले नाव मागे घेतले आहे. परंतु आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर लगेच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या खेळाडूंना आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी देणार यात काही शंका नाही. (Relief for bcci, austrelian cricketers likely to participate in remaining matches of ipl)
आयपीएलच्या सर्व फ्रँचाईजींनी बीसीसीआयला म्हटले आहे की, ‘परदेशी खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु बीसीसीआयतर्फे अधिकृतरित्या काहीच माहिती दिली गेली नाही. परंतु सर्व फ्रँचाईजी आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना खेळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.’
क्रिकबजच्या एका अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, ‘आयपीएल स्पर्धेबाबत बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत देखील संपर्क केला आहे. ईसीबीने यापूर्वी स्पष्ट केले होते की, आयपीएल स्पर्धा पुन्हा खेळवली गेली तर, इंग्लंडचे खेळाडू सहभाग घेणार नाहीत. तरीदेखील बीसीसीआ ईसीबीचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे.’
आयपीएल स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू खेळणार की नाही? यावर १५ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. अन्यथा त्या खेळाडूंऐवजी नवीन खेळाडूंना संधी देण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या-
‘मिस्टर ऍंड मिसेस बुमराह’ इंग्लंडमध्ये करतायत धमाल मस्ती, क्यूट सेल्फीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
टोमणे मारण्यात पटाईत; भारतीय महिला संघाची स्तुती करताना वॉनचा विराटसेनेला टोमणा






