आयपीएल २०२२चा हंगाम शेवटाकडे चालला आहे, ज्यामुळे हळूहळू प्लेऑफचे गणित स्पष्ट होत आहे. २ वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. अशात कोलकाता संघाला मोठा झटका बसला असल्याचे समजत आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. क्रिकबझने या वृत्ताची पुष्टी केली आहे.
क्रिकबझने जाहीर असलेल्या अहवालानुसार, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हंगामातील ६१वा साखळी फेरी सामना खेळताना रहाणेला ग्रेड ३ हॅमस्ट्रिंगची दुखापत (Grade III Hamstring Injury) झाली असून ही दुखापत गंभीर आहे. यामुळे तो या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणही करू शकला नव्हता. त्याने सोमवारी (१६ मे) कोलकाता संघाचे बायोबबल सोडले आहे. परिणामी तो संघाचा शेवटचा साखळी फेरी सामना खेळू शकणार नाही. याबरोबरच आगामी इंग्लंड दौऱ्यासाठीही (India Tour Of England) तो अनुपलब्ध असेल.
आयपीएल २०२२चा हंगाम २९ मे रोजी संपेल. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल, ज्यामध्ये त्यांना कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. उभय संघांमघ्ये २०२१ साली ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित झाला होता, जो आता २०२२मध्ये खेळवला जाणार आहे. रहाणे दुखापतीमुळे (Ajinkya Rahane Injury) या सामन्याला मुकू शकतो.
दरम्यान रहाणे आयपीएल २०२२मधील प्रदर्शन सरासरी राहिले आहे. तो आतापर्यंत १३ पैकी ७ सामने खेळू शकला आहे. ७ सामने खेळताना १९च्या सरासरीने १३३ धावाच करू शकला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून साधे अर्धशतकही निघालेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, जानेवारी २०२२ पासून तो संघाबाहेर आहे. त्याला आयपीएलपूर्वी मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठीही संघात निवडले गेले नव्हते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लढवय्या रहाणे! प्रचंड वेदनेनंतरही संघासाठी खेळला, अजिंक्यची ‘ही’ बाजूही कौतुकास्पदच
तेव्हा मायदेशात भारताला धूळ चारण्यासाठी पाकिस्तानने बनवला होता ‘असा’ प्लॅन, तरीही झाले होते अपयशी
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद