बीसीसीआयच्या सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानला (Mustfijur Rehman) संघातून मुक्त (Release) केले होते. या निर्णयावरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बीसीसीआय आपला निर्णय बदलण्याचा विचार करत आहे. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) अध्यक्षांनी यावर अधिकृत उत्तर दिले असून, यामुळे वाद अधिकच वाढताना दिसत आहे.
मुस्तफिजुरला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बीसीसीआय आणि बीसीबीमधील संबंध बिघडले आहेत. यानंतर बीसीबीने तातडीने बैठक बोलावली आणि आयसीसीकडे अशी मागणी केली की, त्यांचे टी-20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत हलवण्यात यावेत. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, मुस्तफिजुरला बाहेर काढण्याचा निर्णय बीसीसीआयच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला होता आणि त्यामध्ये इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला गेला नव्हता. त्यामुळे बीसीसीआय आपला निर्णय बदलू शकते, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, बीसीबीचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी मुस्तफिजुरला आयपीएल 2026 मध्ये परतण्याची ऑफर मिळाल्याच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
‘आजकेर पत्रिका’नुसार, बीसीबी अध्यक्ष म्हणाले की, मुस्तफिजुरच्या आयपीएलमधील पुनरागमनाबाबत माझी बीसीसीआयशी कोणतीही लेखी किंवा तोंडी चर्चा झालेली नाही. मी माझ्या बोर्डातील कोणाशीही या विषयावर बोललेलो नाही. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.






