येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्शवभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. यात जगभरातील १११४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. परंतु बीसीसीआयकडून २९२ खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि इतर संघाच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. आयपीएलचे आयोजन येत्या ११ एप्रिल पासून होऊ शकते. तसेच आयपीएल भारतातच होणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे.
अशातच शनिवारी(१३ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे की दक्षिण आफ्रिका संघ एप्रिल महिन्यात ३ एकदिवसीय सामने आणि ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा १६ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.
अशात जर आयपीएल भारतात खेळवण्यात आली तर दक्षिण आफ्रिकन संघाचे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी उपलब्ध नसतील. कारण १६ एप्रिलनंतर जरी ते भारतात आले तरी कोव्हिड -१९ च्या नियमांनुसार त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागू शकते.
या संघांना बसू शकतो फटका
दक्षिण आफ्रिकन संघाचे खेळाडू हे संघातील विजयांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. अशातच जर पहिल्या दोन आठवड्यांसाठी ते उपलब्ध नसतील तर याचा फटका नक्कीच काही संघांना बसू शकतो. चेन्नई सुपर किंग्स संघाला अनेक सामने जिंकवून देणारा फलंदाज फाफ डू प्लेसिस तसेच जलद गोलंदाज लुंगी एन्गिडी यांचा समावेश आहे.
तर क्विंटन डी कॉक हा सुद्धा मुंबई संघासाठी उपलब्ध नसू शकतो. तसेच दिल्ली संघाच्या गोलंदाजीचा हुकुमाचा एक्का कागिसो रबाडा तसेच एन्रीच नॉर्किए अनुपलब्ध असू शकतात. याव्यतिरिक्त १४ असे खेळाडू आहेत ज्यांचा समावेश आयपीएलच्या लिलावात सुद्धा आहे.
याबाबत बीसीसीआय दक्षिण आफ्रिका बोर्डच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर बोर्ड फ्रांचायझींना माहिती देईल.
महत्त्वाच्या बातम्या –
चालू सामन्यात रोहित शर्माने रिषभ पंतच्या डोक्यात मारली टपली, पाहा गमतीशीर व्हिडिओ
हरभजनबद्दची आठवण सांगताना आर अश्विन म्हणाला, ‘माफ कर भज्जू पा, पण मी आनंदी आहे’