एखाद्या खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. याशिवाय काही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवतात. या पार्श्वभूमीवर रिकी भुईचं नाव वेगानं पुढे आलं आहे. रिकी भुईनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे उत्कृष्ट कामगिरी केली, त्याआधारे त्यानं टीम इंडियाच्या मधल्या फळीसाठी दावा ठोकलाय.
रिकी भुई सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डी संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत त्यानं इंडिया ए संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली. इंडिया डी समोर दुसऱ्या डावात 488 धावांचं लक्ष्य होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाचा सलामीवीर अथर्व तायडे खातं न उघडताच बाद झाला. यानंतर रिकी भुईनं शानदार शतकी खेळी खेळली. त्यानं 195 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 113 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतरही इंडिया डी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, तरी रिकी भुईचं कौतुक होतं आहे.
जर आपण रिकी भुईच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोललो, तर ती खूप चमकदार राहिली आहे. त्यानं आतापर्यंत एकूण 73 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यानं 46.67 च्या सरासरीनं 4994 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 19 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली. रिकी भुईची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 187 आहे. याशिवाय त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2116 धावा आणि टी-20 मध्ये 1500 धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे.
रिकी भुई अशीच कामगिरी करत राहिल्यास त्याला टीम इंडियाच्या मधल्या फळीत संधी मिळू शकते. मधल्या फळीत तो भारतीय संघासाठी एक उत्कृष्ट पर्याय बनू शकतो. मात्र, त्याचा मार्ग तितकासा सोपा होणार नाही, कारण सध्या या जागेसाठी अनेक दावेदार उपस्थित आहेत.
हेही वाचा –
“काही खेळाडू नियमांच्या वर…” ‘या’ अंपायरने केला धोनीवर गंभीर आरोप
बांगलादेशच्या गोलंदाजांची आता खैर नाही! कडक सिक्स मारत विराटने सराव सत्रादरम्यान तोडली भिंत
मोहम्मद शमीचा टीम इंडियात कमबॅक कधी? स्वत: दिलं मोठं अपडेट