ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या दिवस- रात्र कसोटी सामन्यात शनिवारी (१९ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाहुण्या भारतीय संघाची दयनीय अवस्था केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाचे फलंदाज २ तासही टिकू शकले नव्हते. अशात भारताला सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे त्वरित त्याला संघात परत बोलावण्याचा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी भारतीय संघाला दिला आहे.
रोहित शर्माला संघात परत बोलवा- पाँटिंग
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पाँटिंग म्हणाले, “भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देणाऱ्या फलंदाजाची खूप आवश्यकता आहे. म्हणून रोहित शर्माला लवकरात लवकर सलामीवीर फलंदाजांच्या रुपात भारतीय संघात स्थान देण्यात यावे. निश्चितपणे रोहित खेळेल. तो मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यापेक्षा चांगला कसोटीपटू आहे. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असेल, तर त्याला वरच्या फळीत फलंदाजीला पाठवण्यात यावे.”
ऑस्ट्रेलियामध्ये आहे रोहित शर्मा
आयपीएल २०२० दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झालेला रोहित बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत होता. दुखापतीतून सावरल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या परवानगीने रोहित ऑस्ट्रेलियामध्ये आला आहे. सध्या तो सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. पुढे जर भारतीय संघाच्या मेडिकल स्टाफने रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित केले, तर तो तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.
येत्या ७ जानेवारी-११ जानेवारी दरम्यान सिडनी येथे तिसरा आणि १५ जानेवारी-१९ जानेवारी दरम्यान ब्रिसबेन येथे चौथा व अंतिम कसोटी सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने उडवली टीम इंडियाची खिल्ली; चाहत्यांनी शिकवला चांगला धडा
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला खेळायचंय आयपीएल
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व