भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (ICC Champions Trophy 2025) भारतासाठी सलग आयसीसी ट्राॅफी जिंकणारा रोहित शर्मा पहिलाच कर्णधार ठरला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचे भरभरून कौतुक होत आहे. पण रोहित शर्मा 2027चा वनडे विश्वचषक खेळणार की नाही? याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगचा असा विश्वास आहे की रोहित शर्मा अजूनही एक मजबूत खेळाडू आहे आणि दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे होणाऱ्या 2027च्या वनडे विश्वचषकापर्यंत तो भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक वगळता सर्व आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 मध्ये घरच्या मैदानावर खेळला गेलेला वनडे विश्वचषक जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.
रिकी पॉन्टिंग म्हणाला, मला वाटतं रोहित त्या प्रश्नांना कायमचा संपवण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणत होता, नाही, मी अजूनही खूप चांगला खेळत आहे, मला या संघात खेळायला आवडते, मला या संघाचे नेतृत्व करायला आवडते. पॉन्टिंग म्हणाला, माझ्यासाठी याचा अर्थ असा की त्याचे 2027 मध्ये होणाऱ्या पुढील वनडे विश्वचषकात खेळण्याचे ध्येय असले पाहिजे.
पॉन्टिंग म्हणाला की, रोहितच्या मनात त्याची कारकीर्द सुरू ठेवण्यामागे वनडे विश्वचषक जिंकण्याची इच्छा असू शकते. तो म्हणाला, मला वाटतं की त्याच्या मनात हे असेल की त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत हरला होता, तो वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू इच्छितो, ज्या प्रकारे त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार खेळी केली, त्यावरून तुम्ही असे म्हणू शकत नाही की तो ते चुकला आहे.






