भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याला फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणे, हे फिनिशरचे काम असते. रविवार रोजी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुबई येथे झालेल्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यातही धोनीने फिनिशरची भूमिका चोखपणे निभावली. त्याच्या १८ धावांच्या छोटेखानी पण आक्रमक खेळीमुळे चेन्नई संघाने १९.४ षटकातच हा सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
धोनीच्या या खेळीचे क्रिकेजगतातून तोंडभरुन कौतुक होते आहे. अगदी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईचा प्रतिस्पर्धी असलेल्या दिल्लीच्या संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही त्याच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना पाँटिंग म्हणाले की, “धोनी क्रिडाविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. सामना सुरू असताना आम्ही डगआऊटमध्ये बसून विचार करत होतो की, पुढील फलंदाज रविंद्र जडेजा किंवा धोनी असेल. त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांना मी म्हटले होते की, आता धोनी फलंदाजीला येईल आणि सामन्याचा विजयी शेवट करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा धोनी क्रिकेट खेळणे बंद करेल किंवा पूर्णपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, तेव्हा निश्चितपणे त्याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून विस्मरणात ठेवले जाईल.”
या सामन्यापूर्वी धोनीविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजांनी विशेष रणनिती आखली होती. परंतु मैदानावर मात्र त्यांना त्या रणनितीनुसार गोलंदाजी करता आली नाही. याविषयी पाँटिंग म्हणाले की, “आम्ही शेवटच्या २ षटकात धोनीविरुद्ध जशी गोलंदाजी करायला हवी होती, तसे करण्यात आम्हाला यश आले नाही. सर्वांनाच माहिती आहे की, धोनीपुढे एकही चूक झाली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. यापूर्वी बऱ्याचदा याचा प्रत्यय आला आहे. आमच्याकडूनही तीच चूक झाली आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागले.”
महत्त्वाच्या बातम्या-
मॅच फिनिशर धोनीचा उलगडा, दिल्लीविरुद्ध अंतिम षटकात ‘या’ योजनेसह उतरला आणि सामना पालटला
चेन्नईविरुद्धच्या २ चूका कर्णधार रिषभला पडल्या भलत्याच महागात, नाही तर आता फायनलमध्ये असती दिल्ली!