भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढचा मोठा काळ तो क्रिकेट खेळू शकणार नाहीये. माहितीनुसार पंत आगामी आयपीएल आणि वनडे विश्वचषकात देखील खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असून संघाला त्याच्या अनुपस्थितीत मोठे नुकसान होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी खास प्रतिक्रिया दिली.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting ) मागच्या काही हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. पाँटिंगच्या मार्गदर्शनात संघाचे प्रदर्शन देखील चांगलेच सुधारल्याचे पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचे मैदानातील समिकरण अनेकदा विरोधी संघांसाठी आव्हान ठरले आहे. दोघांनी मिळून आयपीएलमध्ये अनेक विजय देखील मिळवले आहेत. अपघातात झालेल्या दुखापतीनंतर पंत पुढच्या मोठ्या काळासाठी खेळू शकणार नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पण पाँटिंगच्या मते जर तो चालू शकत असेल, तर त्याने आयपीएलदरम्यान संघासोबत डगआउटमध्ये यायला हवे.
आयसीसीसोबत बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला, “डगआउटमध्ये रिषभ पंत रोज माझ्या जवळ हवा आहे. जर आयपीएलदरम्यान तो प्रवास करू शकत असेल तर त्याने डगआउटमध्ये उपस्थित राहावे, अशी माझी इच्छा आहे. तो नुसता उपस्थित जरी असला, तर संघातील इतर खेळाडूंवर त्याचा प्रभाव पडतो. मला तो खूप प्रिय आहे आणि ही गोष्ट मी त्याला काही दिवसांपूर्वी फोनवर बोललो आहे. तो लवकरच मैदानात पुनरागमन करेल, अशी मला अपेक्षा आहे.”
दरम्यान, पंतच्या अनुपस्थितीत आयपीएलच्या आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवीन कर्णधाराची आवश्यकता असेल. संघातील दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वॉर्नर आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. वॉर्नरकडे यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाचा मोठा अनुभव आहे. (Ricky Ponting’s reaction to Rishabh Pant’s injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-