सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. वनडे मालिका बरोबरीत सुटल्यानंतर उभय संघ टी२० मालिकेत भिडतायेत. बुधवारी (२७ जुलै) मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी रायली रूसो याने पुनरागमन केले. तब्बल सहा वर्षानंतर तो राष्ट्रीय संघासाठी खेळत आहे. मधल्या काळात तो कोलपॅक करारामुळे इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसला. आगामी टी२० विश्वचषकाचा विचार करता त्याला दक्षिण आफ्रिका संघात पुन्हा स्थान दिले गेले आहे.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार डेव्हिड मिलरने त्याचे संघात स्वागत केले. मिलर म्हणाला,
“आम्ही एकत्र कारकीर्द सुरू केली होती. त्याला पुन्हा एकदा संघात पाहताना आम्हाला आनंद होतोय. आता जगभरातील विविध टी२० लीगमध्ये त्याचा अप्रतिम खेळ झाला आहे. तो संघासाठी पुन्हा एकदा तितकाच महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकतो.”
रूसोने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका साठी क्रिकेट खेळणे बंद करत वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी कोलपॅक करार स्वीकारला होता. तेव्हापासून तो जगभरातील अनेक टी२० लीग गाजवतोय. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या टी२० ब्लास्टमध्ये त्याने १९२ च्या स्ट्राईक रेटने ६२३ धावा केल्या होत्या. पाकिस्तान सुपर लीग व बिग बॅश लीगमध्ये तो मोठे नाव म्हणून ओळखला जातो.
इंग्लंडला जाण्याआधी रूसोने ३६ सामन्यात १२३९ धावा केल्या होत्या. यात ३ शतके व ७ अर्धशतकांचा समावेश होता. २०१५ वनडे विश्वचषकात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच १५ टी२० ही तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकात तो दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला आणखी मजबूती देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”
प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर
शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”