एशिया कप 2025 पूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह यूपी प्रीमियर टी20 लीगमध्ये धडाकेबाज फफलंदाजी करत आहे. गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी गोर गोरखपूर लायन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी शतक ठोकत आपल्या मेरठ मॅव्हरिक्स संघाला एकहाती विजय मिळवून दिला. गोरखपूरने मेरठसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते, हे लक्ष्य कर्णधार रिंकू सिंहच्या शतकी खेळीमुळे मेरठने 6 विकेट आणि 7 चेंडू शिल्लक ठेवत सहज गाठले. 168 धावांपैकी रिंकू सिंहने नाबाद 108 धावा केल्या ज्यात 7 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट 225 होता. या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करताना गोर गोरखपूर लायन्सने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 167 धावा केल्या. मॉडर्न डे टी20 क्रिकेटमध्ये हे मोठे स्कोअर मानले जात नाही, विशेषतः टूर्नामेंटच्या सुरुवातीला. गोरखपूरचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कर्णधार ध्रुव जुरेल होता ज्याने 38 धावा केल्या, तर निशांत कुशवाहाने 37 धावांचे योगदान दिले. याशिवाय गोरखपूरचा कोणताही फलंदाज 25 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
मेरठसाठी विशाल चौधरी आणि विजय कुमार यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेरठची सुरुवात खराब झाली. 8 षटकांतच संघाने 38 धावांवर आपले टॉप-4 फलंदाज गमावले होते. नंबर-5 वर फलंदाजीसाठी आलेल्या रिंकू सिंहने नंतर अशी वादळी खेळी केली की गोरखपूरचा एकही गोलंदाज त्याच्यापुढे टिकू शकला नाही.
परिस्थिती पाहून रिंकूने खेळीची सुरुवात सावध केली होती. पहिल्या 34 चेंडूंवर त्याने केवळ 58 धावा केल्या, पण त्यानंतर त्याने 5वा गियर टाकला आणि पुढच्या 14 चेंडूंवर 364.3 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मेरठ मॅव्हरिक्सचा संघ यूपी टी20 प्रीमियर लीग 2025 च्या पॉइंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.






