बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत रिषभ पंतनं शानदार शतक झळकावलं. कार अपघातानंतर जवळपास दोन वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतनं ही त्याच्यासाठी सर्वोत्तम खेळी असल्याचं म्हटलं आहे. टीम इंडियानं पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला. या विजयात पंतनं महत्त्वाची भूमिका बजावली. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 109 धावा केल्या.
सामन्यानंतर शतकाबद्दल बोलताना पंतनं महेंद्रसिंह धोनीची आठवण काढली. तो म्हणाला, “हे चेन्नई सुपर किंग्जचं घरचं मैदान आहे. माही भाईनं या मैदानावर खूप क्रिकेट खेळलय. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र मला स्वतःची ओळख बनवायची आहे. लोक माझी तुलना कशाशी आणि कोणासोबत करतात, याची मला पर्वा नाही. मी गोष्टी अगदी सोप्या ठेवतो आणि माझं सर्वोत्तम देण्यावर अधिक भर देतो.”
पंतनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक झळकावलं. टीम इंडियासाठी 6 शतकं झळकावणारा तो महेंद्रसिंह धोनीनंतरचा दुसरा यष्टिरक्षक आहे. भारताचा माजी कर्णधार धोनीनं 90 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर रिषभ पंतनं केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
रिषभ पंत सामन्याबाबत बोलताना म्हणाला की, “माझी विचारसरणी साधी ठेवून मी परिस्थितीनुसार फलंदाजी केली. तिसऱ्या दिवशी त्यांनी फिरकीपटूंसह सुरुवात केली, त्यामुळे मी माझ्या खेळाला बॅक केलं आणि डाव पुढे नेला. मला याची जाणीव होती की आम्ही 3 विकेट गमावल्या होत्या आणि राहुलभाईनंतर (केएल राहुल) येणाऱ्या खालच्या ऑर्डरवर दबाव टाकण्याची गरज नव्हती.”
अपघातानंतर प्रदीर्घ काळ संघाबाहेर असलेल्या रिषभ पंतचं मनोबल या शतकानंतर खूप उंचावेल, ज्याचा फायदा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून होईल. भारताला अजून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांचा सामना करायचा आहे.
हेही वाचा –
विराट कोहलीनं घेतली बांगलादेशची मजा! मैदानावरील नागिन डान्सचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाला मिळाले पुजारा-रहाणेचे उत्तराधिकारी! ही जय-वीरूची नवी जोडी करणार कसोटीत धमाल
580 सामने आणि 92 वर्ष! भारताच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं